पुसेगाव येथील एका हायस्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:48+5:302021-02-21T05:14:48+5:30
पुसेगाव : येथील एका हायस्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या ...
पुसेगाव : येथील एका हायस्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या शाळेतील दोन विद्यार्थी हायरिस्कमध्ये आले आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, पुसेगाव येथील एका हायस्कूलमध्ये
शनिवार, दि. १३ रोजी एक विद्यार्थिनी कोरोनाबाधित असल्याचे समजले. त्यानंतर लगेचच शासनाच्या आदेशानुसार संबंधित विद्यालय बंद करण्यात आले. सर्व मुलांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्यात आली आहे.
त्यामध्ये शाळेतील पाच विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल शनिवार, दि. २० रोजी सकारात्मक आला आहे. नेरमधील दोन, तर पुसेगावातील तीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन विद्यार्थी हायरिस्क आहेत.
पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येत आहे. दररोज सुमारे शंभर विद्यार्थ्यांची टेस्ट होत आहे. त्यात पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले, तर सर्व शिक्षकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काही विद्यार्थ्यांनी ही टेस्ट अद्यापपर्यंत केलेली नाही.
पाचवी ते दहावी वर्गातील अशा विद्यार्थ्यांची शाळेमार्फत सोमवार, दि. २२ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरटीपीसीआर टेस्ट करून मिळेल.
त्यानंतर टेस्ट करून घ्यावयाची झाल्यास पालकांना ती स्वत:च्या जबाबदारीवर करून घ्यावी लागणार आहे.