श्रावणी सहलीमध्ये पाच हजार बियांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:23 PM2017-08-24T16:23:08+5:302017-08-24T16:23:38+5:30
मायणी : कलेढोण, ता. खटाव येथील विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रावण सहल व वनभोजन कार्यक्रमादरम्यान कलेढोण परिसरातील डोंगरावर पाच हजार बियांचे रोपण केले. यामुळे येथील डोंगररांगा हिरव्यागार होण्यास मदत होणार आहे. मुलांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

खटाव-माण तालुक्यातील पूर्वेकडील भाग कायम दुष्काळी आहे. याठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे वृक्षाची संख्याही कमी आहे. डोंगररांगा आहेत, पण या ठिकाणी खडक मिश्रीत जमीन असल्यामुळे झाडाची संख्या कमी आहे.
अनेकवेळा शासनाने वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेतले. त्याचा काही ठिकाणी फायदा झाला आहे. तसेच येथील कलेढोण भागातील डोंगरावर आजही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच झाडे आहेत. त्यामुळे हा डोंगर झाडाविनाच दिसत असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी श्रावणी सहल व वनभोजनादरम्यान खेळण्याचा व खाण्याचा आनंद तर घेतलाच शिवाय पाच हजार बियांचे रोपणही केले.
त्यामुळे येत्या काळात जर या भागात पाऊस झाल्यास नक्कीच या बियांचे रोप तयार होईल व हा डोंगर हिरवागार होण्यास मदत होईल. विद्यार्थी व शिक्षकांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.