पाच गावे आणि एक आण्णासाहेब... त्यात सर्व्हर डाऊन.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:39 AM2021-03-27T04:39:58+5:302021-03-27T04:39:58+5:30
कोपर्डे हवेली : महसुली विभागाचा गाव पातळीवर प्रत्येक माणसाचा संबंध तलाठी यांच्याशी येत असतो. त्यामुळे कामासाठी तलाठी सजात लोकांची ...
कोपर्डे हवेली : महसुली विभागाचा गाव पातळीवर प्रत्येक माणसाचा संबंध तलाठी यांच्याशी येत असतो. त्यामुळे कामासाठी तलाठी सजात लोकांची कायमच गर्दी असते. सध्या कोपर्डे हवेली परिसरातील गावांमध्ये एक तलाठी आणि पाच गावे अशी अवस्था असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांची कामे रखडली असून कोपर्डे हवेली सारख्या मोठ्या गावाला पूर्ण वेळ तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कोपर्डे हवेलीत सध्या संजय सावंत हे तलाठी म्हणून पाच गावे संभाळत आहेत. त्यामध्ये पार्ले, बनवडी,वडोली निळेश्र्वर आदी गावांचा समावेश असून कोपर्डे हवेली आणि उत्तर कोपर्डे या गावांचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे.
सध्या सोसायटीची कर्ज प्रकरणे सुरू असल्याने इ कराराची ऑनलाईन कामे प्रलंबित आहेत. अनेक कागदांची पूर्तता तलाठी कार्यालयाकडून करावी लागते. पण एक तलाठी आणि पाच गावे असल्याने आणि वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळेत शेतकऱ्यांना कागदपत्रे मिळत नाहीत. शिवाय वर्षांपासून अनेकांच्या वारस नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयात वादावादीचे प्रकार घडत असतात. कोपर्डे हवेली सारख्या मोठ्या गावात खातेदारांची संख्या मोठी आहे.
सतत सातबारा, खाते उतारे, उत्पन्नाचे दाखले, अल्पभूधारक दाखले, नोंदी, वाटणी पत्र आदी कामांसाठी लोक सतत कार्यालयात असतात. पण इतर गावाला तलाठी वेळ देताना कोपर्डे हवेली गावाला पूर्ण वेळ मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ तलाठी मिळावा अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.
चौकट
शेतकऱ्यांचे निवेदन
तलाठ्यांनी त्वरित कामे करावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, रवी चव्हाण आदीसह शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
फोटो : कोपर्डे हवेली येथील तलाठी कार्यालयात लोकांनी गर्दी केली.