एका दाखल्यासाठी पाच खिडक्यांना प्रदक्षिणा
By admin | Published: June 19, 2015 12:03 AM2015-06-19T00:03:45+5:302015-06-19T00:18:57+5:30
तहसील कार्यालयातील स्थिती : चिरीमिरी देणाऱ्यांना मागील दारातून प्रवेश; वेळ वाचविण्यासाठी पालकही मारताहेत ‘शॉर्टकट’
जावेद खान - सातारा -शाळा तसेच महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रात प्रचंड गर्दी होत आहे. एका दाखल्यासाठी किमान पाच खिडक्यांकडे कागदपत्रे पाठवावी लागत असल्याने दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पाल्यांचा तासन्तास वेळ वाया जात आहे. तहसील कार्यालयात दाखला कमी वेळेत मिळविण्यासाठी ओळखी अन् चिरीमिरी देखील सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्न, नॉन क्रिमिनल आदी दाखल्यांची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यायालच्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी होत आहे. दररोज जवळ पास पाचशेहून अधिक नागरिक दाखल्यासाठी अर्ज करीत आहे. परंतु हे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.
दाखले मिळविण्यासाठी येथील पाच खिडक्यांना कागदपत्रे फिरवली जात असून, अर्जांची संख्या पाहता या कार्यालयाच्या खिडक्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे दाखले वेळेत मिळविण्यासाठी पालकांची धडपड नजरेस पडत आहे. अर्ज घेण्यापासून प्रतिज्ञा पत्र देईपर्यंत प्रत्येक खिडकीत तासन्तास जात असल्याने दाखल्यासाठी किमान दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर पर्याय म्हणून शासनाने किमान जून महिन्यात तरी खिडक्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान, कमी वेळेत दाखले मिळावेत म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे. यासाठी सेतू कार्यालयाच्या प्रवेशदारातून अर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. खास करून येथील काही मुद्रांक विक्रेते या कार्यालयात दारातून आत प्रवेश करून कामाचा निपटारा करताना दिसत आहे.
या कामासाठी संबंधितांकडून अधिक पैसेही घेतले जात आहे.
अशा पद्धतीनेही दाखले मिळाले असल्याचे काही विद्यार्थी व पालकांनी सांगितले.
एकाच रांगेत पाच-पाच व्यक्ती
वेळ अन् पैसा वाचविण्यासाठी काहीनी अनोखी शक्कल लढविली आहे. दाखल्यासाठी एकाच वेळी पाच खिडक्यांवर पाच व्यक्ती नंबर लावतात व एकामागे एक असे करून पाचही खिडक्यांत अर्जाची पूर्तता करतात. त्यामुळे बराचवेळ वाचत असून, अनेकांनी ओळखी-पाळखी करून ही शक्कल लढवित आहेत.
निवृत्त तहसीलदारही रांगेत
येथील निवृत्त तहसीलदार प्रमोद पेटकरी हेही दाखल्यासाठी रांगेत होते. पाय दुखत असल्याने त्यांनी नंबर लावून सेतू कार्यालयातील कोपऱ्यात बसले होते. दाखल्यासाठी वाढत असलेली रांगा पाहता जवळपास ५०० हून अधिक जणांचे रोज अर्ज येत असल्यामुळे शासनाने आणखीन खिडक्या वाढवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सध्या विविध कामांसाठी दाखला आवश्यक आहे. त्यामुळे सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. या सर्वांनाच दाखले मिळतील, असे नाही. शेवटी असणाऱ्याला दाखला मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशी हेलपाटा बसतोच.
- नितीन कारंडे, विद्यार्थी