धक्कादायक! पाच वर्षांच्या मुलावर अत्याचार करुन केली हत्या, अल्पवयीन मुलगा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:14 PM2021-12-08T17:14:34+5:302021-12-08T17:15:38+5:30
पाच वर्षांच्या मुलाला त्याने एका पडक्या घरात नेले. येथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने दहावीतील मुलाने त्या चिमुकल्याचे तोंड आणि गळा दाबला.
सातारा : पाच वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करून दहावीतील मुलाने तोंड व गळा दाबून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच असलेल्या म्हसवे येथे घडली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा केवळ दोन तासांत उघडकीस आणून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर म्हसवे हे गाव आहे. या गावातील पाच वर्षांचा मुलगा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अचानक गायब झाला. गावातील नागरिक आणि घरातल्यांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.
अखेर एका व्यक्तीला त्या मुलाचा मृतदेह एका पडक्या घरात सापडला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचली. या टीमने तत्काळ गावातील मुलांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी हा प्रकार दहावीतील पंधरा वर्षांच्या मुलाने केला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आढेवेढे न घेता गुन्ह्याची कबुली दिली.
पाच वर्षांच्या मुलाला त्याने एका पडक्या घरात नेले. येथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आरडाओरड केल्याने दहावीतील मुलाने त्या चिमुकल्याचे तोंड आणि गळा दाबला. त्यामुळे श्वास गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला. असे पोलिसांच्या तपासात समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने हा गुन्हा उघडकीस आणला. यातील संशयित हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याशी पोलिसांनी गोड बोलून माहिती काढली. त्यामुळे या हत्या प्रकरणाला वाचा फुटली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, वैभव सावंत, मोहन पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
फॉरेन्सिक तज्ज्ञांना पुरावे सापडले!
अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करून चिमुकल्याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिंग तज्ज्ञांना पाचारण केले. या टीमला घटनास्थळी काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. तसेच पीडित मुलाच्या शवविच्छेदन अहवालानंतर आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.