पाच वर्षे दुष्काळ...आता आमिषांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:33+5:302021-01-13T05:43:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची ...

Five years of drought ... now a rain of lures! | पाच वर्षे दुष्काळ...आता आमिषांचा पाऊस!

पाच वर्षे दुष्काळ...आता आमिषांचा पाऊस!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची आठवण झालेली आहे. मतदारांच्या दृष्टीने पाच वर्षे दुष्काळ होता. आता प्रत्येक नेता आमिषांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र निवडणूक लागलेल्या गावागावांत पहायला मिळत आहे. उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये आता प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक गावांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. वेगवेगळ्या गटाचे उमेदवार दिवसातून अनेकदा मतदारांच्या घराचे उंबरे झिजवत आहेत. कुठली भावकी कुणासोबत याचे अंदाज बांधले जात असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू होत्या. ज्या मतदानाची खात्री वाटत नाही, तिथे वारंवार जाऊन सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी दबावाचे राजकारण खेळले जात आहे.

काही गावांत मतदार तणावाखाली आहेत. प्रशासनाने या संवेदनशील गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याची गरज आहे.

बुधवारी सायंकाळी साडेपाचनंतर जाहीर प्रचार करता येणार नसल्याने उमेदवार आणि त्यांचे पॅनलप्रमुख रात्री उशिरापर्यंत वॉच ठेवून आहेत. सहकारी संस्थेत नोकरीला लावण्याचे आश्वासन अनेकांना दिले गेले असल्याने आता नेतेमंडळी किती लोकांना सहकारी संस्थेत नोकरी देणार हा प्रश्न निवडणुकीनंतर उभा राहू शकतो.

अनेक गावांत विकासकामांच्या मुद्द्यांवर प्रचार होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक देखील सोयीचे राजकारण करत असल्याने वास्तविक विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये तर पूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढण्यात आलेले आहेत. ऐन निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने उमेदवार व पॅनल प्रमुखांची गोची होऊ लागलेली दिसते. अनेक गावांत आमदार व त्यांच्याविरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवारांनी लक्ष घातले आहे. या निवडणुकीतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व पुढे येणार असल्याने काहींनी मोर्चेबांधणी हाती घेतलेली आहे, अशा परिस्थितीत मतदारांच्या डोक्यात मात्र गोंधळ दिसून येतो. भावकी, व्यक्तिगत संबंध या आधारावरच मतदार मतदान करणार असल्याचे दिसते.

निवडणूक लागलेल्या एकूण ग्रामपंचायती : ८७८

सदस्य संख्या : ७२६६

प्रभाग संख्या : २८१३

पूर्णत: बिनविरोध ग्रामपंचायती : १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायती : ९८

बिनविरोध सदस्य : २६३१

निवडणूक लढविणारे उमेदवार : ९५२१

जाहीर प्रचार आज थांबणार

निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार मतदान थांबण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबविण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवार, दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबेल. त्यानंतर मतदारांवर वैयक्तिक दबाव तसेच आमिषे दाखविण्याचे प्रकार वाढणार असल्याने प्रशासनाला जास्त दक्ष राहावे लागणार आहे.

Web Title: Five years of drought ... now a rain of lures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.