पाच वर्षांत जादूटोणाविरोधात तब्बल ३५० गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:49 PM2018-08-19T23:49:02+5:302018-08-19T23:49:06+5:30
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे होत आहेत. त्यांच्या जाण्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विवेकवादी लढा थांबलेला नाही. कार्यकर्ते आणखी जोमाने काम करत आहेत. पाच वर्षांत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ३५० पेक्षा जास्त गुन्हे नोंद झाले. तसेच वर्षानुवर्षे जातपंचायतीच्या दहशतीने बहिष्कृत झालेल्या शेकडो कुटुंबांना आधार मिळाला आहे.
विवेकवादातून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या पश्चात अंनिसचे काय होणार, असा प्रश्न अनेक स्तरातून उपस्थित केला गेला. मात्र, संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर यांच्यासह सहकाऱ्यांनी विविध आघाड्यांवर काम सुरू ठेवून चळवळ वाढवली. नुसती वाढवली नाही तर जोमाने रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाला जादूटोणाविरोधी व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करावा लागला. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधन आणि पाठपुरावा सुरू असताना, आंतरजातीय-धर्मीय सत्यशोधकी लग्न, व्यसनमुक्तीसाठी उपक्रम अशा प्रकारे दाभोलकरांच्या पश्चात त्यांच्या विचाराने संस्थेचे काम सुरू आहे.
पर्दाफाशची वाढती कमान
हजारो कथित बाबा, बुवामहाराज, मांत्रिक, देवऋषी यांचा पर्दाफाश
दरवर्षी सुमारे १०० बुवा, बाबांचा भांडाफोड
अध्यात्मिक बुवाबाजी विरोधात सातत्याने प्रबोधन व अंतविरोधी प्रदर्शन
जातपंचायतीला मूठमाती अभियानअंतर्गत बाधितांना मदत तसेच बहिष्कार, वाळीत टाकण्याविरोधात कायदेशीर कारवाई
चमत्कारचे सादरीकरण व त्यामागील विज्ञान समजावून सांगणारे तीन हजार प्रात्यक्षिके
देवाच्या नावाने होणारी यात्रेतील पशुहत्या थांबविण्यात १५० ठिकाणी यश
विसर्जित गणपती व निर्माल्य दान मोहीम
सत्यशोधकीय विवाह सोहळे
२० आॅगस्ट आता वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस...
दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर मारेकºयांचा शोध घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून दर महिन्याच्या २० तारखेला पुणे येथील ओंकारेश्वर पुलावर अविरत जवाब दो आंदोलन सुरू आहे. यंदापासून २० आॅगस्ट हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.