झेंडा मिरवणुकीने आज सेवागिरी यात्रेस प्रारंभ
By admin | Published: January 3, 2016 10:23 PM2016-01-03T22:23:07+5:302016-01-04T00:48:14+5:30
पुसेगावनगरी सज्ज : पाळणे, फिरती चित्रपटगृहे दाखल; १४ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त भरवण्यात येणाऱ्या वार्षिक यात्रेस सोमवार, दि. ४ रोजी सकाळी ९ वाजता मानाचा झेंडा व पालखी मिरवणुकीने प्रारंभ होत असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व विश्वस्तांनी यांनी दिली.
सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा सोमवार, दि. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत पुसेगाव येथे भरणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता मानाचा झेंडा, पालखी मिरवणुकीने या यात्रेस प्रारंभ होत आहे. पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा, मंत्रपुष्पांजली सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय दत्तात्रय जाधव, अॅड. विजयराव जाधव, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे.
श्री सेवागिरी विद्यालय, श्री हनुमानगिरी हायस्कूल, शासकीय विद्यानिकेतन, इंदिरा गांधी कन्या प्रशाला तसेच विविध शाळेतील विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होणार आहे. झांजपथक, लेझीम, बँडपथके यांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी मंदिर ते यात्रास्थळ अशी झेंडा व पालखीची सवाद्य मिरवणूक होणार आहे.
‘यावर्षी पाऊसकाळ चांगला नसला तरी नेर तलावात असलेला पाणीसाठा यात्रेकरूंसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे भाविकांना मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रास्थळावर व परिसरात अत्यंत शिस्तबद्धपणे विविध स्टॉल्सचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रास्थळालगत पुसेगाव ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुबलक पाणी यात्रेकरूंसाठी व बैलबाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे इतस्तत: न बांधता बैलबाजारासाठी नियोजित केलेल्या जागेवरच बांधून सहकार्य करावे,’ असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. (वार्ताहर)
हॉटेल, खेळणी अन् मेवा-मिठाईची दुकाने दाखल
पुसेगाव येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. सातारा-पंढरपूर राज्य महामार्गालत श्री सेवागिरी मंदिर ते शिवराज कार्यालय या तीन किलोमीटर परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा तसेच शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात यात्रा भरवण्यात येते. या यात्रेत स्टेशनरी, मेवा-मिठाई, संसारोपयोगी वस्तू, हॉटेल्स, सौंदर्यप्रसाधने, स्वेटर, खेळणी, पादत्राणे ,पाळणे, जिलेबीची दुकाने, फिरती चित्रपटगृहे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार
यात्रेनिमित्त पुसेगाव येथे दि ४ व ५ जानेवारीदरम्यान दिवसरात्र आखिल भारतीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा होणार असल्याची माहिती डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या स्पर्धेसाठी दोन स्वतंत्र मैदाने तयार करण्यात आली आहेत. विजेत्या संघांना अनुक्रमे २५०००, १५०००, १००००, ५००० व २००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या संघास सेवागिरी चषक देण्यात येणार आहे. दि. ४ रोजी सांयकाळी ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असल्याचे विजय जाधव यांनी सांगितले.
क्रिकेट स्पर्धेस दिमाखात प्रारंभ
श्री सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथे रविवार, दि. ३ रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, बारामती, इंदापूर, पेठनाका, इस्लामपूर, कोल्हापूर, शिरवळ, जयसिंगपूर, कोरेगाव, पुसेगाव, माण इलेव्हन, शेखर गोरे इलेव्हन आदी १६ संघ सहभागी झाले आहेत. ५ षटकांच्या या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच काम पाहणार आहेत. विजेत्या संघांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार २१ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.
मंदिराला विद्युतरोषणाई
सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त येथील मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच १९५० मध्ये विसापूर येथील कुशल कारागीर शिवराम गोविंद सुतार यांनी तयार केलेल्या महाराजांच्या रथाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे.