फ्लेमिंगोच्या आगमनाने येरळवाडीला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:22 PM2019-01-20T23:22:33+5:302019-01-20T23:22:38+5:30

वडूज : उंच मान, लांब पाय अन् गुलाबी रंगाची पिसे असलेल्या फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांनी येरळवाडी (ता. खटाव) तलावात शनिवारी ...

Flamingo's arrival came from Yerulwadi | फ्लेमिंगोच्या आगमनाने येरळवाडीला बहर

फ्लेमिंगोच्या आगमनाने येरळवाडीला बहर

Next

वडूज : उंच मान, लांब पाय अन् गुलाबी रंगाची पिसे असलेल्या फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांनी येरळवाडी (ता. खटाव) तलावात शनिवारी सायंकाळी ‘लॅँडिंग’ केले. पन्नास ते साठ पक्ष्यांचा थवा तलावाजवळ विसावल्याने पक्षीप्रेमींसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले तलावाकडे वळू लागली आहेत.
डिसेंबर महिना सुरू झाला की पक्षीप्रेमींच्या नजरा फ्लेमिंगो (रोहित) या परदेशी पाहुण्याकडे लागून राहतात. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हे पक्षी येरळवाडी तलाव परिसरात थव्याने येतात. काही दिवसांचा पाहुणचार आटोपून ते पुन्हा इतरत्र मार्गस्थ होतात. यंदा डिसेंबर महिन्यातील फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर पडल्याने पक्षीप्रेमींमध्ये नाराजी होती. मात्र, शनिवारी सायंकाळी येरळवाडी तलावात या पक्ष्यांनी ‘लॅँडिंग’ केले अन् पक्षीप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला.
येरळवाडी तलावात मुबलक पाणीसाठा असल्याने या पक्ष्यांना खाद्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे. तलाव परिसरात दलदलीच्या भागात हे पक्षी मासे, कीटक, आटोलियासारख्या वनस्पतींच्या शोधात मुक्तविहार करताना दिसून येत आहेत. या पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमींची पावले येरळवाडी तलावाकडे वळू लागली आहे. येरळवाडी तलाव परिसरातील काही ठिकाणी फ्लेमिंगोची आवडती ठिकाणे आहेत. या तलावात मुबलक व पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच खाद्य उपलब्ध असल्याने हे पक्षी या ठिकाणी किती दिवस मुक्काम करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर पक्ष्यांचाही किलबिलाट
फ्लेमिंगोसह येरळवाडी तलावात चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल या पक्ष्यांचा किलबिलाटही सुरू झाला आहे. पक्षीप्रेमींसह पर्यटकांना हे पक्षी नेहमीच आपल्याकडे आकर्षित करू लागले आहे. पोषक वातावरण व खाद्याची उपलब्धता निर्माण झाल्याने या पक्ष्यांचा तलावाकाठी दर्शन होऊ लागले आहे.

Web Title: Flamingo's arrival came from Yerulwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.