फ्लेक्समुळे गुदमरतोय झाडांचा जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:35 PM2017-09-23T12:35:19+5:302017-09-23T12:38:59+5:30
सातारा येथील राजवाडा चौपाटी परिसरात लावण्यात आलेली झाडं फ्लेक्सच्या जाहीरात बाजीमुळे गुदमरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सातारा : शतकोटी वृक्ष लागवडीचे ध्येय घेवून पुढे जाण्याची शासानची योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली गेली. पण पुढे पाठ... मागे सपाट! अशी अवस्था शहरातील वृक्ष लागवडीच्या बाबत पहायला मिळत आहे. येथील राजवाडा चौपाटी परिसरात लावण्यात आलेली झाडं फ्लेक्सच्या जाहीरात बाजीमुळे गुदमरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शहरातील काही स्वंयसेवी संस्थांनी राजवाडा चौपाटीवर आपटा, कडूनिंब यासारखी झाडे लावली होती. ही शोभेची झाडं जगवण्याची जबाबदारी चौपाटीवरील व्यावसायिकांनी घेतली होती. काही दिवस काळजी घेतल्याने या झाडांची वाढ चांगली झाली. मात्र, मोक्याच्या ठिकाणी असलेली झाडं फ्लेक्स व्यावसायिकांना बोचू लागली. फ्लेक्सवरील आपल्या जाहिराती दिसाव्यात यासाठी त्यांनी चक्क ही झाडं मोडण्याचा आणि तोडण्याचाही प्रयत्न केला.
महानगरांच्या तुलनेत सातारा शहरातील रस्त्यांवर मुळातच वृक्षांची कमतरता आहे. त्यात ज्या काही संस्थांनी ती झाडं लावून त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली आहे, त्यांना बळ देण्याचं सोडून झाडं मोडण्याचा दांभिकपणा केला जात आहे. याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे या फ्लेक्स व्यावसायिकांचे भलतेच फावले आहे. याविषयी चौपाटी व्यावसायिकांचेही त्यांच्याबरोबर वाद झाले आहेत. यातून मार्ग काढत चौपाटी बंद झाल्यानंतर रात्री उशीरा हे फ्लेक्स लावले जात आहेत.