पुसेगावच्या यात्रेला फ्लेक्स मुक्तीचे वेध..
By admin | Published: December 21, 2016 11:47 PM2016-12-21T23:47:16+5:302016-12-21T23:47:16+5:30
बैठकीत सकारात्मक चर्चा :
परवानगी शिवाय फ्लेक्स लावल्यास कडक कारवाई; ग्रामपंचायतीचा इशारा
पुसेगाव : सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा व नवीन वर्षाचे स्वागत तसेच आगामी निवडणुकांचे औचित्य साधून यंदाच्या पुसेगाव यात्रेत फ्लेक्सयुद्ध चांगलेच रंगण्याची शक्यता होती. मात्र, बुधवार, दि. २१ रोजी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायत व्यतिरिक्त कोणीही फ्लेक्स लावायचा नाही, तसेच वर्षभर ग्रामपंचायत, पुसेगाव पोलिस ठाणे व संबंधित जागेचा मालक यांच्या परवानगी शिवाय फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कडक कारवाई करण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच व ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव, सत्यम जाधव, वैभव भोसले, अनिल बोडके, सुरेखा जाधव, सीमा जाधव, हेमा गोरे, मनीषा पाटोळे ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे आदी उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि. २३ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत होणार आहे. बुधवार, दि. २८ रोजी या यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी रथसोहळा होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक व गुजरात राज्यांतील लाखो भाविक हजेरी लावतात. तसेच खरसुंडी, आटपाडी येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारापेक्षाही मोठा बैल बाजार पुसेगावात भरतो.
यावर्षी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तरीय युवा महोत्सव, शरीर सौष्ठव स्पर्धा, वान शर्यती अशा स्पर्धांचे आयोजनही यात्रा कालावधीत करण्यात आले आहे.
दरम्यान, श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेचे निमित्त पुढे करत विविध राजकीय पक्ष व संस्था यात्रेच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भले मोठे फ्लेक्स पुसेगावातील चौकासह सर्वच रस्त्यांवर व जागा मिळेल तेथे लावतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. गावातील बऱ्याच दुकानदारांनी व व्यावसायिकांनी फ्लेक्समुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडून दुकानासमोर फ्लेक्स लावण्यास परवानगी देऊ नये, अशा तक्रारींचा अर्ज पुसेगाव ग्रामपंचायतीकडे दिला होता. या अर्जाचा ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार करून बुधवारी झालेल्या बैठकीत कोणाच्याही परवानगी शिवाय फ्लेक्स न लावण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या ठरावामुळे पुसेगावची यात्रा फ्लेक्स मुक्त होणार असून, समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांनी व दुकानदारांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)