कळपात रिक्षा घुसली; अकरा मेंढ्या ठार

By admin | Published: January 10, 2016 12:55 AM2016-01-10T00:55:18+5:302016-01-10T00:55:18+5:30

पंधरांहून अधिक जखमी : पाचवड फाट्यानजीक दुर्घटना; मेंढपाळांचा उपमार्गावर ठिय्या

Flood rickshaws; Eleven sheep killed | कळपात रिक्षा घुसली; अकरा मेंढ्या ठार

कळपात रिक्षा घुसली; अकरा मेंढ्या ठार

Next

मलकापूर : चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक रिक्षा मेंढ्यांच्या कळपात घुसली. या दुर्घटनेत अकरा मेंढ्या ठार, तर पंधरा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर पाचवड फाटा येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुपेरे-कार्वे येथील आनंदा कुशाबा हराळे हे मेंढपाळ आपल्या तीनशे मेंढ्यांचा कळप घेऊन कऱ्हाड तालुक्यात आले आहेत. दररोज ठिकठिकाणी जाऊन ते मेंढ्या चारतात. शुक्रवारी दुपारी ते पाचवड फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर मेंढ्या चारत होते. आनंदा हराळे यांच्यासह कुटुंबीय आसपास थांबून मेंढ्या हाकत होते. दरम्यान, याचवेळी उपमार्गावरून कऱ्हाडहून पाचवड फाट्याकडे निघालेल्या मालवाहतूक रिक्षावरील (एमएच ५० - ५०९४) चालकाचा ताबा सुटला. रिक्षा मेंढ्यांच्या कळपात घुसली.
हराळे कुटुंबीयांना काही समजण्यापूर्वीच रिक्षाने पंचवीसहून अधिक मेंढ्यांना चिरडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या मेंढ्या महामार्गाच्या दिशेने पळाल्या. हराळे कुटुंबीयांनी या मेंढ्या अडवल्या; मात्र रिक्षाखाली सापडलेल्या मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी हराळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
घटनेनंतर हराळे कुटुंबीयांनी रस्त्यावरच ठाण मांडले. मृत व जखमी मेंढ्या रस्त्यावरच पडून होत्या.
घटनेची माहिती मिळताच कऱ्हाडचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमी मेंढ्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. तसेच वाहतूक पूर्ववत सुरू केली.
घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Flood rickshaws; Eleven sheep killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.