फलटणमध्ये ओढ्यांना पूर; अनेक पूल पाण्याखाली...
By admin | Published: September 23, 2016 11:43 PM2016-09-23T23:43:54+5:302016-09-23T23:54:27+5:30
परतीच्या पावसाचा दणका : पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
सातारा : राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतानाच शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील खटाव, फलटण, पाटण तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे फलटण तालुक्यातील ओढ्यांना पूर
आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले होते.
सातारा शहरात दुपारी तीननंतर अचानक पावसाला सुरुवात झाले. अवघा पंधरा मिनिटांच्या पावसानंतर सायंकाळी पाचनंतर काळे ढग जमा झाले होते. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता.
फलटण तालुक्यातील निंभोरे, सुरवडी परिसरात चांगला पाऊस झाला. दुपारनंतर आलेल्या पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत होते. ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे पूर आला होता. त्यामुळे पुणे-पंढरपूर मार्ग तासबंद बंद होता. अनेक ठिकाणी विद्यार्थीही अडकून पडले होते. खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात शुक्रवारी पावसाचा तडाखा बसला. शेतीच्या कामात मग्न असलेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या पावसामुळे पळापळ झाली.
पाटण तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. शुक्रवारीही दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे परिस्थितीनुसार कमी अधिक उघडले जात होते. गुरुवारी रात्री साडेअकराला साडेसात फूट उघडलेले दरवाजे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दोन फुटांवर आणले. (प्रतिनिधी)
पुरामुळे निंभोरेत विद्यार्थी अडकले
४मलटण : फलटण तालुक्यातील निंभोरे, सुरवडीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेतीनपासून मोठा पाऊस पडला. निंभोरे-काशिदवाडीमधील ओढ्यांना आलेल्या पुरामुळे पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. यामुळे ठिकठिकाणी विद्यार्थीही अडकले होते. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
४ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक दुकानांत पाणी शिरले. ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण केले असले तरी पावसाच्या पाण्याने महामार्ग रोखून धरला होता.
निंभोरेच्या तरुणांची संवेदनशीलता
प्रचंड पाऊस पडल्याने आलेल्या पुराने अनेकजण अडकून पडलेले असताना पुराच्या पाण्यात उतरून दुचाकी चालक, विद्यार्थिनी, महिला तसेच वृद्ध यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम तरुण करत होते.