कोसळधारेने कऱ्हाड, पाटणला जलप्रलय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:10+5:302021-07-24T04:23:10+5:30
कऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात जलप्रलय सुरू आहे. गुरुवारपासून सुरू झालेली कोसळधार अद्यापही थांबलेली नाही. त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या ...
कऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात जलप्रलय सुरू आहे. गुरुवारपासून सुरू झालेली कोसळधार अद्यापही थांबलेली नाही. त्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या असून पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, गुंजाळे या गावांतील काही घरांवर दरडी कोसळल्या आहेत. तर हुंबरळीत ओढ्याच्या पुरामध्ये काही घरे वाहून गेली. कऱ्हाड शहरासह अन्य काही गावे पुराच्या विळख्यात असून, क्षणाक्षणाला वाढणारी पाणीपातळी धडकी भरवत आहे.
कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर आला असून, पाण्याने पात्र सोडले आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे. कोयना नदीकाठची अनेक गावे भीतीच्या छायेखाली आहेत. शुक्रवारपासून धरणाचे वक्र दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे या विसर्गाचा परिणाम सायंकाळपासून जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अगोदरच इशारा पातळी ओलांडलेल्या नद्या धरणातील विसर्गामुळे रौद्ररूप धारण करीत आहेत. पाटण शहरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर पाटणनजीकच्या अनेक गावांमध्येही पाण्याने शिरकाव केला आहे. तालुक्यातील बहुतांशी पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावे संपर्कहीन झाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांतील वीजपुरवठा गुरुवारपासून खंडित आहे. तसेच मोबाइल नेटवर्कही कोलमडल्यामुळे प्रशासन चिंतित आहे. बाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.
कऱ्हाड शहरातील पाटण कॉलनीसह दत्त चौकातील साई मंदिरही पाण्याने वेढले आहे. प्रीतिसंगम घाटावर कृष्णामाई मंदिरही पाण्यात गेले आहे. कृष्णेची पाणीपातळी वाढल्यामुळे शहरातील पूररेषेतील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच पूरसदृश्य परिस्थितीत मदतीसाठी आपत्ती कक्ष सतर्क झाला आहे. तांबवेसह अन्य गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तालुक्यातील काही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारीही दिवसभर कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शनिवारी महापुरासह अनेक संकटांचा या दोन्ही तालुक्यांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
- चौकट
पॉइंटर
१) आंबेघरमध्ये घरांवर दरड कोसळली
२) मिरगावात भूस्खलनात अनेकांचा मृत्यू
३) ढोकावळेत दरड कोसळल्याने घरे गाडली
४) मोरगिरी-गुंजाळेत दरडीसह रस्ताही कोसळला
५) हुंबरळीत ओढ्याचा प्रवाह बदलला
६) हुंबरळीत ओढ्याच्या पुरात घरे गेली वाहून
७) कऱ्हाड शहरात पुराचे पाणी शिरले
८) तांबवेतील पूल पुन्हा पाण्याखाली
९) कुंभारगाव-मानेगाव रस्त्यावर दरड कोसळली
१०) कऱ्हाड-चांदोली मार्गावर पाणी, वाहतूक ठप्प
११) कऱ्हाड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग बंद
- चौकट
दक्षिण मांडला महापूर; नांदगावला घरांमध्ये पाणी
कऱ्हाड दक्षिण विभागातील दक्षिण मांड नदीला महापूर आला असून, नांदगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून, बाधित कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. मारुती लोहार, जगन्नाथ लोहार, रघुनाथ पाटील, शंकर पाटील, गणपतराव पवार, राजेंद्र पवार, शहाजी पाटील, रामराव पाटील, दिलीप पाटील, पंडित पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- चौकट
तांबवेत बोट दाखल
तांबवे गावाला बेटाचे स्वरूप आले असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावात बोट दाखल झाली आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी गावात भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह सरपंच व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
- चौकट
वांग नदीचे रौद्ररूप; घरे पाण्यात
कुसूर : वांग नदीने रौद्ररूप धारण केले आहे. कऱ्हाड तालुक्यातील आणे, येणके आणि अंबवडे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून, अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पोतले-येणके नवीन पूलही पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. आणे येथील नदीकाठच्या घरांसह स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.
- चौकट
पोतले गावाला पुराचा विळखा
किरपे येथे कोयना नदीला मिळालेल्या वांग नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पोतले-येणके दरम्यानचा नवीन पूल पाण्याखाली गेला असून, जुने पोतले गावाला पाण्याचा विळखा पडू लागल्याने ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
फोटो : २३केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाडातील पाटण कॉलनीसह दत्त चौकानजीकच्या साई मंदिराला पाण्याने वेढले असून, शुक्रवारी सायंकाळी पुराच्या पाण्याने शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली. (छाया : अरमान मुल्ला)