पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:45+5:302021-08-02T04:14:45+5:30

चाफळ : चाफळ विभागात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून देत मोठ्या प्रमाणात शेतीसह गावपोहोच रस्ते, फरशी पूल, पिण्याच्या पाण्याच्या ...

The floodwaters inundated the homes of many | पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर

पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचा संसार उघड्यावर

Next

चाफळ :

चाफळ विभागात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून देत मोठ्या प्रमाणात शेतीसह गावपोहोच रस्ते, फरशी पूल, पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसह दरडी कोसळल्याने नुकसान झाले आहे. चाफळला उत्तरमांड नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट अनेकांच्या घरात शिरल्याने संसार उपयोग साहित्य भिजून संसार उघड्यावर पडले आहेत.

या नुकसानग्रस्त भागाची माजी शिक्षण सभापती राजेश पवार, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पवार यांनी पाहणी करत संबंधित गावांचे गावकामगार तलाठी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर जाऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशीपूल पाण्याखाली गेल्याने तर शिंगणवाडीसह इतर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. डोंगर उतारावरील केळोली, पाडळोशी, धायटी, पाठवडे गावात पावसाचे पाणी शेतात घुसल्याने भात शेती वाहून गेली आहे. पाठवडे बाटेवाडीतून बौध्दवस्तीला जोडणारा रस्ता वाहून गेला. मांडकेश्वर मंदिराची संरक्षण भिंत कोसळली. शेताचे बांध वाहून गेल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाणेगाव खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गाळाने भरून पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरेवाडी मार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. एकूणच चाफळ विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या नुकसानीची माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी पाहणी करत माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पवार, रामचंद्र झोरे, विरेवाडी सरपंच शिवाजी जाधव, उमाजी जाधव, ग्रामसेवक तात्यासाहेब दंडिले उपस्थित होते.

दरम्यान पवार यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: The floodwaters inundated the homes of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.