साखरवाडीतील माळरानावर फुलवली फुलशेती!
By admin | Published: April 2, 2017 04:21 PM2017-04-02T16:21:00+5:302017-04-02T16:21:00+5:30
कष्टाचे चिज : ग्रामस्थांच्या श्रमदानातील खड्ड्यात डोलताहेत फुले
आॅनलाईन लोकमत
उंब्रज (सातारा), दि. २ : उन्हाच्या झळा सर्वांना जाणवू लागल्या आहेत. ह्यझाडे लावा, झाडे जगवाह्णची साद घातली जात आहे. असे असतानाच कऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीतील ग्रामस्थांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर शंभरहून अधिक वेगवेगळी झाडे, फुलझाडे लावून जगवली आहेत.
साखरवाडी हे कऱ्हाड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अवघ्या चारशे लोकसंख्येचे गाव. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेर गावी असतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिलेले हे गाव. पण कायम विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव.
ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी, अशी कल्पना माजी सरपंच शंकर पवार यांना सुचली. त्यांनी ती ग्रामस्थांपुढे मांढली. युवक युवतीसह सर्वांनी साध देण्याचा निर्धार केला. अन् उजाड माळरान हिरवेगार करण्याच्या मोहिमेचा श्रीगणेश केला.
साखरवाडीतील सत्तर युवक, तीस युवती, विद्यार्थी, पुरुष, महिला सर्वजण जुलै महिन्यात एकत्र आले. गावासह मुंबई, परगावी असलेल्या ग्रामस्थांनी वर्गणी दिली. ही वर्गणी ४० हजारच्या आसपास जमली. सुरुवात खड्डे काढण्यापासून झाली. खड्डे झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथून पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा या फुलझाडाची रोपे आणली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन ही रोपे खड्यांमध्ये लावली.
त्यानंतर सुरुवात झाडे जगवण्याची धडपड सुरु झाली. पाण्याच्या टाकीपासून सर्व क्षेत्रात ठिबक करण्यात आले. चोरे, साखरवाडी राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाणी या गावाला आले. पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक अडचण आली की पाणी-पाणी करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत. असे प्रकार कायम घडत असतात.
यावेळी झरा शोधून पाणी आणावे लागते. पण लहान मुलांसारखी सर्व झाडांची ग्रामस्थ घेत आहेत. झऱ्याचे पाणी प्रथम झाडांना नंतर घरी. अशा प्रकारे ही झाडे जगवण्यात येत आहेत. सद्या कडक उन्हामुळे भयानक परिस्थिती असताना ही झाडे हिरवीगार आहेतच. पण फुलझाडे फुलांनी फुलली असल्यामुळे ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झालेल्याचा आनंद चेऱ्यावर दिसतो. ग्रामस्थ आनंदी असून यापुढेही असेच प्रयत्न सुरु ठेऊन हा पूर्ण ओसाड परिसर हिरवागार करणार या मानसिकतेत दिसून येत आहेत.
ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनासाठी देवळात गेल्यावर परिसरातील देवस्थानची उजाड जमीन कायम डोळ्यात खुपत होती. हे माळ ग्रामस्थाच्या सहकायार्तून हिरवेगार करावे, असे डोक्यात आले. कल्पना मांडली. पाठींबा मिळाला. काम सुरू झाले. साखरवाडीतील युवक, युवती, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक सर्वजण मदत करू लागले. बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांनीही आर्थिक मदत केली. प्रत्येक झाड जोपसले अन् जगवले. उन्हाच्या झळा सोसून झाडांना पाणी कमी पडू दिले नाही. वेळ प्रसंगी झऱ्यातून, जीपगाडीतून पाणी आणून झाडे जगविली. माळरानात उमललेली फुले पाहून सार्थ झाल्याचा आनंद मिळतो.
- शंकर पवार,
माजी सरपंच