पाटण तालुक्यात फुलतायत स्ट्रॉबेरीचे मळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:59+5:302021-01-13T05:40:59+5:30
पाचगणी, महाबळेश्वरसारखाच पाटणचा डोंगर परिसर असून, समतोल वातावरण आणि त्याच पद्धतीची खडकाळमिश्रित जमीन हे साम्य आहे. हे निदर्शनास आल्यानंतर ...
पाचगणी, महाबळेश्वरसारखाच पाटणचा डोंगर परिसर असून, समतोल वातावरण आणि त्याच पद्धतीची खडकाळमिश्रित जमीन हे साम्य आहे. हे निदर्शनास आल्यानंतर गावडेवाडीतील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून श्रमजीवी संस्थेच्या संचालकांनी झरे विकास प्रकल्प योजनेला महत्त्व देऊन प्रायोगिक तत्त्वावर गावडेवाडी येथे स्ट्रॉबेरीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याची योजना अमलात आणली आहे. त्यापूर्वी श्रमजीवी संस्थेचे संचालक बाळासाहेब कोळेकर यांचे चिरंजीव राम कोळकर यांनी गावडेवाडीच्या २० ते २५ शेतकऱ्यांना पाचगणी, भिलार येथे नेऊन तेथील स्ट्रॉबेरीचे मळे दाखवले. त्यानंतर माजी सरपंच धोंडीराम ताटे, सतीश कदम व इतर शेतकऱ्यांनी सुरुवात म्हणून काही गुंठे क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागण नुकतीच केली आहे.
जिथे गवताशिवाय काही उगवत नाही तसेच जांभा दगडाची विस्तीर्ण पठारे आहेत, त्याच भागात आता स्ट्रॉबेरीचे मळे फुलत आहेत. गावडेवाडी व इतर गावे उंचावर असल्यामुळे वाऱ्याचा दाब आणि जोरदार पाऊस अशी प्रतिकूल परिस्थिती असते. या वातावरणात स्ट्रॉबेरी पिकवायचा घेतलेला निर्णय म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. मात्र, गावडेवाडीच्या शेतकऱ्यांनी लावलेले स्ट्रॉबेरीचे प्लॉट सद्यातरी आशादायक दिसून येत आहेत. अवघ्या तीन महिन्यांतच त्याचा रिझल्ट दिसणार आहे.
- चौकट
गावडेवाडी आणि परिसरातील युवक नोकरी व व्यवसायानिमित्त पुणे-मुंबईला जातात. त्यापेक्षा व्यावसायिक शेती करण्याचे धाडस केले, तर फायदा होईल. हा निर्णय मनामध्ये बाळगून आमच्या संस्थेने पुढाकार घ्यायचे ठरवले. त्यानुसार गावडेवाडी येथे झरे विकास प्रकल्प, स्ट्रॉबेरी, बांबू लागवड आणि सुधारित गहू उत्पादन असे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे.
- राम कोळेकर
श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, सातारा
- कोट
गावडेवाडी गावामध्ये श्रमजीवी सहायक मंडळ आणि अॅटलास कोपको चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील पाण्याचे स्त्रोत एकत्र करून पाण्याचे झरे विकास प्रकल्प राबवला जात आहे. ठिकठिकाणी मोठे हौद बांधले आहेत. त्याचबरोबर नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून गावातील सात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी या पिकाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे.
- धोंडीराम ताटे
माजी सरपंच, गावडेवाडी
फोटो : ११केआरडी०५
कॅप्शन : पाटण तालुक्यात डोंगर पठारावर वसलेल्या गावडेवाडीतील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.