Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

By दीपक शिंदे | Published: August 16, 2023 02:12 PM2023-08-16T14:12:27+5:302023-08-16T14:12:52+5:30

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी फुलांचा बहर

Flowers on Kas plateau will bloom after September 1, Increase in tourism fees | Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

googlenewsNext

पेट्री : जागतिक वारसास्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास अजून अवधी असून, कासवर खरी रंगाची उधळण १ सप्टेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गतवर्षी शंभर रुपये शुल्क होते. दरम्यान पार्किंग शुल्क व पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीसाठी पार्किंग शुल्क, पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क व पर्यटन शुल्क असे एकत्रित प्रतिव्यक्ती १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय कीर्दत यांनी सांगितले.

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फूलही दिसू लागले आहे. पावसाचे प्रमाण कमी होऊन उन्हाची ताप पडली तरच विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे.

कास पठार कार्यकारी समितीमार्फत सद्य:स्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, भदारतळ, कास तलाव व्ह्यू पाॅइंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे. कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने अभ्यासकांच्या अभिप्रायानुसार पठाराला असणारी लोखंडी जाळी यावर्षी उन्हाळ्यात काढण्यात आली. पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने सध्या पठारावर समितीच्यावतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगुसाची जाळी बसवण्यात आली आहे.

कास परिसरात सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा वातावरण आहे. विकेंड, १५ ऑगस्टमुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून पर्यटक पावसाचा आनंद लुटत आहेत.

धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी 

भारतातील सर्वात उंच वजराई धबधबा, एकीवचा धबधबा येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असून, पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास धबधब्यांचा हंगाम वाढू शकतो.

पठारावर फुलांचा हंगाम अगदी तोंडावर असून, कास पठार कार्यकारी समिती मार्फत पर्यटकांना सुलभ पर्यटन होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. १ सप्टेंबरपासून फुलांची परिस्थिती पाहून शुल्क आकारणी करून हंगाम सुरू करण्यात येईल. -दत्ता किर्दत, उपाध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

Web Title: Flowers on Kas plateau will bloom after September 1, Increase in tourism fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.