बासरीच्या मंगल सुरांनी सज्जनगड मंत्रमुग्ध
By Admin | Published: February 9, 2015 10:10 PM2015-02-09T22:10:18+5:302015-02-10T00:06:12+5:30
दासनवमी संगीत महोत्सव : बंदिश, अभंग गायनाची बरसात
सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात विवेक सोनार यांच्या बासरीच्या मंगल सूरांनी अन् डॉ. राम देशपांडे यांच्या बहारदार गायनाने अवघा सज्जनगड मंत्रमुग्ध झाला. सज्जनगडावर दासनवमी संगीत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी संगीत मैफल झाली. विवेक सोनार यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरूवात अप्रचलित असलेल्या राग वाचास्पतीने केली. यानंतर आलाप, जोड व तीन तालातील रचना त्यांनी रसिकांसमोर सादर केल्या. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने संपूर्ण गडावरील वातावरण कृष्णमय झाले होते.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. राम देशपांडे यांनी राग यमनकल्याणमधील बंदिशीने सुरुवात केली. यामध्ये एक तालाचा तराणा त्यांनी सादर केला. यानंतर समर्थ रामदास रचित ‘इथे का रे उभा, श्रीरामा मनमोहन मेघशामा’ हा अभंग आणि ‘पतीत पावना जानकी जीवना’ हे पद सादर करून वाहवा मिळविली. समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर करून श्रोत्यांना वीररसाची प्रचिती दिली. यानंतर संत तुकाराम रचित ‘आम्ही बिघडलो...’ हा अभंग सादर करून भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
गंधार देशपांडे यांनी गायनाची साथ केली. तन्मय देवचक्के यांनी संवादिनीवर तर प्रशांत पांडव यांनी तबल्यावर साथ केली. संदीप जाधव यांनी पखवाजावर तर माऊली टाकळकर यांनी टाळाची साथ केली. स्वानंद बेदरकर यांनी निवेदन केले. मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०१५ रोशी सायंकाळी ६ वाजता पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)