उड्डाणपूल खुजा... वाहतुकीची दुर्दशा

By admin | Published: December 17, 2015 10:39 PM2015-12-17T22:39:31+5:302015-12-17T22:55:39+5:30

खोळंबा नित्याचाच : महामार्गाखाली अडकतात वाहने

The flyover is dry ... Traffic plight | उड्डाणपूल खुजा... वाहतुकीची दुर्दशा

उड्डाणपूल खुजा... वाहतुकीची दुर्दशा

Next

खंडाळा : दळवणवळणाच्या सोयींसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी या महामार्गाच्या घडणीतच असलेल्या त्रुटींमुळे महामार्ग अडचणींचा ठरत आहे. या मार्गाच्या रुंदीकरणापूर्वी त्यातील समस्यांवर मार्ग काढावा अशीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा या ठिकाणी सध्या असणारा उड्डाणपूल हा अरुंद आणि कमी उंचीचा असल्याने वाहतुकीला अडचण ठरत आहे. केवळ तात्पुरता विचार करून खंडाळ्याचा हा उड्डाणपूलच वाहतुकीची खरी डोकेदुखी बनली आहे.खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या असवली, अजनूज, वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, कण्हेरी, जवळे, कवठे, अतिट, लोहोम यांसह चौदा गावांना खंडाळ्यातील या महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जावे लागते. वास्तविक हा पूल अतिशय कमी उंचीचा आहे. त्याखालून मोठे कंटेनर, उसाच्या ट्रॉली, ट्रक जाऊ शकत नाहीत. तर पुलाखालून जाणारा रस्ता अरुंद असल्याने एसटी बस, ट्रक यांना वळणही घेता येत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. सध्या ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे उसाच्या गाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्याला या पुलाखाली मोठी अडचण होते.खंडाळा तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणाचे सध्या चार टप्पे विकसित होत आहेत. शासनाच्या आराखड्याप्रमाणे तालुक्यात लहान मोठ्या सहाशे कंपन्यांचे जाळे पसरणार आहे. या कंपन्यांचे दररोज शेकडो ट्रक कंटेनर यांची ये-जा राहाणार आहे. मात्र, त्यासाठी मोठा पूल अस्तित्वात नाही. आजही कारखान्यांमध्ये येणारी अनेक कंटेनर, वाहने या पुलाखाली बसत नाहीत. मग भविष्यात या वाहतुकीला पर्याय काय? असा गहण प्रश्न उभा आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी हायवे प्रशासनाने कोणती दुरदृष्टी ठेवून उड्डाणपुलाची निर्मिती केली. यासाठी खर्च झालेले कोट्यावधी रुपये जनतेच्या माथी मारले जात आहेत. मात्र लोकांना गरजेपुरत्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. ही खरी शोकांतिका आहे.खंडाळ्यात नव्याने साखर कारखाना उभारणी अंतिम टप्यात आहे. कारखाना सुरू झाल्यावर रोज शेकडो ऊस वाहतूक गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे खंडाळा-पारगाव येथे नव्याने २५ बाय ४५ बाय २५ बाय मीटर लांबीचा व ५.५ मीटर रुंदीचा मोठा उड्डाणपूल बांधावा ही नागरिकांची मागणी रास्त आहे. त्यासाठी जमिनीचा भूसंपादनात कोणाचीही अडचणीची भूमिका नाही. लोकांनी भूसंपादनाला विरोध केला नव्हता. मात्र, महामार्गावर चांगला सर्वसुविधांयुक्त उड्डाणपूल व्हायला हवा याकडे प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. नव्या औद्योगिकीकरणाने कंपन्यांची रेलचेल होणार आहे. त्यांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी दळणवळण सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्गावर मोठा उड्डाणपूल असणे गरजेचे आहे. महामार्ग प्रशासनाने भविष्याचा विचार करून तातडीने उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी.
-शैलेश गाढवे, अध्यक्ष औद्योगिक सेल खंडाळा तालुका

Web Title: The flyover is dry ... Traffic plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.