चक्का जाम!
By Admin | Published: January 31, 2017 11:52 PM2017-01-31T23:52:52+5:302017-01-31T23:52:52+5:30
मराठा समाज रस्त्यावर : जिल्ह्यात तीसहून अधिक ठिकाणी आंदोलन
सातारा : ‘मराठा क्रांती मोर्चा’तून आपली ताकद दाखवून देणाऱ्या मराठा बांधवांनी मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या एकीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात तब्बल तीस ठिकाणी अत्यंत शांततेत अन् संयमाने ‘चक्का जाम’ आंदोलन यशस्वी झाले. या काळात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गासह सारेच रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते.
चक्का जाम आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार होते; परंतु तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच घरातून बाहेर पडले होते. मिळेल त्या वाहनांनी ते नियोजित आंदोलनस्थळी जमा होत होते.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, खंडाळा-पारगाव चौक, आणेवाडी टोल नाका, साताऱ्यातील वाढे फाटा, उंब्रजमध्ये तळबीड टोल नाका, कऱ्हाडला कोल्हापूर नाका येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेकडो वाहनांची चाकं जाग्यावर थांबली होती. महामार्गाच्या इतिहासात बहुधा प्रथमच इतका जास्त काळ आंदोलन झाले; परंतु कोठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही.
तसेच दहिवडीत पिंगळी चौक, पुसेगावमध्ये शिवाजी चौक, कोरेगावात आझाद चौक, रहिमतपूर, फलटण, लोणंदमध्ये बसस्थानकासमोर, वाठार, मेढ्यातील-बाजार चौक, पाटणमधील जुने स्टँड, वाईतील बावधन नाका, म्हसवड, डिस्कळ- शिवाजी चौक, वडूजचा शिवाजी चौक, कातरखटावला कात्रेश्वर चौक, मायणी-चांदणी चौक, विखळे फाटा-शिवाजी चौक, पुसेसावळी-दत्त चौक, चौकीचा आंबा-प्रतापराव गुजर चौक येथे आंदोलन करण्यात आले. सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
रुग्णवाहिकेसाठी
आंदोलनकर्ते पांगले
वाढे फाटा, उंब्रज येथे आंदोलन सुरू असताना अचानक एक रुग्णवाहिका तेथे आली. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वयंशिस्तीने महामार्गावरून बाजूला होत गर्दीतून रुग्णवाहिकेसाठी स्वत:हून रस्ता काढून देण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.