साताऱ्याचं ठरलं; माढ्याचं उरलं!; शरद पवार पेच कसा सोडविणार याकडे लक्ष
By नितीन काळेल | Published: April 10, 2024 07:10 PM2024-04-10T19:10:02+5:302024-04-10T19:11:26+5:30
धैर्यशील यांच्या वाढदिवसानंतरच निर्णय!
सातारा : आघाडीतील राष्ट्रवादीने तिसऱ्या यादीत साताऱ्यातही उमेदवार दिला. पण, माढा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. इच्छुकांचे तळ्यात-मळ्यातच सुरू असल्याने गळालाही कोणी लागले नाही. त्यामुळेच पक्षाच्या शेवटच्या उमेदवाराबाबत निर्माण झालेला हा पेच शरद पवार कसा सोडविणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जाहीर होऊन १५ दिवस झाले. पण, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात उमेदवारीचा पेच कायम आहे. पक्षातील अभयसिंह जगताप हे पाय रोवून उभे आहेत. पण, पवार यांच्या मनात वेगळेच असल्याचे दिसत आहे. कारण, भाजपने खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत उठाव झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे नाईक - निंबाळकर यांनी रणजितसिंह यांना प्रचंड विरोध केला आहे. तसेच अकलुजचे मोहिते - पाटीलही नाराज आहेत. भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते यांनाही उमेदवारी हवी होती. पण, दुर्लक्ष झाल्याने ते वेगळ्या वाटेवर आहेत. यामुळेच फलटणचे राजे आणि मोहिते - पाटील यांची भूमिका ही खासदारांच्या विरोधात लढण्याची आहे.
आतापर्यंत मोहिते - पाटील आणि फलटणच्या राजे गटात अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये धैर्यशील मोहिते यांनीच तुतारी हाती घ्यावी, असे निश्चित झाल्याची माहिती आहे. धैर्यशील यांनीही शरद पवार यांची आठ दिवसांपूर्वी भेट घेऊन चर्चा केली. पण, या चर्चेचे फलित दिसलेले नाही. अजूनही धैर्यशील भाजपमध्येच दिसतात. तरीही त्यांच्या मतदारसंघातील भेटी सुरूच आहेत. त्यामुळे धैर्यशील यांचा निवडणुकीचा इरादा पक्का दिसत असला तरी राष्ट्रवादीत जाण्याची हालचाली अजूनही संथच जाणवत आहे. त्यामुळे शरद पवार यांनाही निर्णय घेणे अवघड झालेले आहे.
राज्यातील जागावाटपात महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे १० मतदारसंघ आले आहेत. आतापर्यंत ९ मतदारसंघांचे उमेदवार जाहीर झाले. पण, माढ्याचा तिढा कायम आहे. यातच पवार गटाकडून निवडणूक लढविणाऱ्यांची भूमिका तळ्यात - मळ्यात दिसत आहे. त्यामुळे पवार यांचा गळ कधी लागणार आणि उमेदवारीचा तिढा कधी सुटणार, याकडे लक्ष लागले आहे.
धैर्यशील यांच्या वाढदिवसानंतरच निर्णय!
रामराजे नाईक - निंबाळकर यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी भेट घेतली. तसेच धैर्यशील माेहितेही फलटणला आले. धैर्यशील यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. यावरूनच धैर्यशील तुतारी हाती घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर १३ एप्रिलला धैर्यशील मोहिते यांचा वाढदिवस आहे. यावेळीच ते आपली भूमिका जाहीर करतील आणि शरद पवार गटातून १६ एप्रिलला अर्ज भरतील, अशी चर्चा सुरू आहे. पण, भाजपच्या वरिष्ठांनी यात लक्ष घातल्यास धैर्यशील यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.