निर्बंध पाळू, पण संचारबंदी नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:38+5:302021-07-07T04:47:38+5:30
सातारा : सततच्या संचारबंदीमुळे व्यापारी व हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण होत आहे. उद्योग, व्यवसाय बंद राहत असल्याने अनेकांची ...
सातारा : सततच्या संचारबंदीमुळे व्यापारी व हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण होत आहे. उद्योग, व्यवसाय बंद राहत असल्याने अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे. ‘जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केले जाईल; पण संचारबंदी नको’ अशा भावना साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या नियंंत्रणात असली तरी तरी साखळी काही तुटलेली नाही. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध कठोर केले आहे. सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवा व त्याच्याशी निगडित व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवार व रविवार सर्व व्यवहार बंद असणार आहे. संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून कुठे दहा-पंधरा दिवस होताहेत तोवर पुन्हा एकदा निर्बंध कठोर केल्याने व्यापारी वर्गातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
कोरोना व संचारबंदीचा सर्वाधिक फटका व्यापार, उद्योगाला बसला आहे. गेल्या दीड वर्षात कधीही भरून न येणारे नुकसान व्यापारी वर्गाचे झाले आहे. काही दिवस निर्बंध शिथिल होतात. बाजारपेठ सुरू केली जाते आणि काही दिवसांत पुन्हा संचारबंदी लागू केली जाते. अशा परिस्थितीत व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होऊ लागले आहे. वीज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, बॅँका, पतसंस्थांचे कर्ज फेडायचे कोठून? असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला आहे. जिल्हा प्रशासनाने संचारंबदीबाबत फेरविचार करावा. वेळेचे बंधन घालून बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. व्यापारी, विक्रेत्यांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केले जाईल, अशा भावना व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
(चौकट)
शहरातील दुकाने निम्मी उघडी
जिल्हा प्रशासनाने लागू केलेले संचारबंदीचे निर्बंध व्यापारी व विक्रेत्यांनी काही मनावर घेतले नाही. सोमवारी दिवसभर अत्यावश्यक वगळता इतर दुकानेही निम्मी उघडी ठेवण्यात आली होती. नागरिकांचीदेखील खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. शहरातील खणआळी, राजपथ, पाचशे एक पाटी, पोवई नाका परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली.
(पॉंईंटर)
सातारा शहरातील व्यावसायिक
किराणा दुकान : ३५५
भाजी, फळ विक्रेते : ८४०
कापड व्यावसायिक : २८३
सराफा : ८७
इलेक्ट्रिक : १७७
कृषी : ७५
इतर : ६००
(सोबत तीन कोट)