आगाशिवच्या पायथ्याला बिबट्याच्या डरकाळीची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:30+5:302021-05-30T04:29:30+5:30
मलकापूर : बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याच्या कळपाचे शेतकऱ्यांना दर्शन ...
मलकापूर : बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याच्या कळपाचे शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. दोन दिवसांपूर्वीच विंग शिवारात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला, तर डोंगरावर शुक्रवारी सकाळी फिरायला गेलेल्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले. आगाशिव डोंगराच्या पायथ्याला पाळीव प्राण्यांवर हल्ले व दर्शन होत असल्यामुळे या भागात बिबट्याच्या डरकाळीची दहशत कायम आहे.
आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने प्राणी ठार केले आहेत. गेल्या काही महिन्यात चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत. काहीवेळा तर रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करत पाच-पाच शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समिकरणच झाले आहे. आगाशिव डोंगर पायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून, बिबट्यांच्या कळपाचा असावा, असा अंदाज वन विभागाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर वर्तवला होता. या अंदाजाप्रमाणे साधारणतः एक वर्षाच्या दोन बछड्यांसह मादी बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी त्यावेळीही सांगितले होते. त्यामुळे या परिसरात बिबट्याच्या कळपाचा वावर आहे, हे सिध्द होत आहे.
त्याच पध्दतीने काही दिवसांपूर्वी नांदलापूरसह कापीलमळा परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर होता. तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांना या कळपाचे दर्शनही झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जखिणवाडीत कृष्णानगर येथील राजेंद्र मोहिते यांची शेळी बिबट्याने ठार केली तर चचेगाव येथील टाके वस्तीनजीक ढेब वस्तीवर भिकाजी पवार यांच्या शेडात एक शेळी ठार केली. भरवस्तीत पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यामुळे चचेगावात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वीच विंग, सुतारकी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला केला तर शुक्रवारी डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांनाही बिबट्याचे वीस फुटावरून दर्शन झाले. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. डोंगरालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा कळपानेच वावर आहे, हे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. वरचेवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे डोंगरालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याची दहशत कायम आहे.
चौकट
तक्रार केल्यास नुकसानभरपाई
‘बिबट्या सतत स्थलांतरित होणारा प्राणी आहे. तो स्वतःच्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या प्राण्यांवरच हल्ला करतो. पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्यास तक्रार नोंदवावी, त्यामुळे झालेले नुकसान वन विभागाकडून मिळेल. तसेच शेतात काम करणाऱ्यांनी लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये. बिबट्याची छेडछाड केली तरच तो हल्ला करतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन वनपाल ए. पी. सवाखंडे यांनी केले आहे.