साताऱ्याच्या हिल मॅरेथॉनपटूंसाठी यंदा ‘धावते पाहुणे आपल्या घरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:56 AM2023-08-02T11:56:38+5:302023-08-02T11:57:05+5:30

देशभरात लोकप्रिय असलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे १२ वे पर्व

For Satara hill marathon runners this year guests run to their homes | साताऱ्याच्या हिल मॅरेथॉनपटूंसाठी यंदा ‘धावते पाहुणे आपल्या घरी’

साताऱ्याच्या हिल मॅरेथॉनपटूंसाठी यंदा ‘धावते पाहुणे आपल्या घरी’

googlenewsNext

सातारा : सातारा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून शेकडो धावपटू साताऱ्यात येतात. मात्र, एवढ्या सगळ्या पाहुण्यांना राहण्यासाठी साताऱ्यातील व्यवस्था अपुरी पडत असल्याने अनेकांची गैरसोय होते. बाहेरगावाहून आपल्याकडे येणाऱ्या या पाहुण्यांना याबाबत मदत करण्यासाठी यंदापासून ‘धावते पाहुणे आपल्या घरी’ ही नवी संकल्पना राबवत आहेत.

वाढते वजन व त्यातून वाढलेले मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी सर्वांसाठी आरोग्य व तंदुरुस्ती हा मंत्र घेऊन सुरू झालेल्या सातारा हिल मॅरेथॉनने विश्वविक्रम केला. देशभरात लोकप्रिय असलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे १२ वे पर्व यंदा ३ सप्टेंबरला होत आहे. परगावाहून येणारे धावपटू ज्यांचे नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी साताऱ्यात आहेत, त्यांची सोय कशीबशी होते.

मात्र, अनेक लोकांसाठी रविवारी होणाऱ्या मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी शनिवारची एक रात्र राहण्यासाठी जागा मिळविण्याचा प्रश्न जटिल असतो. वाढलेली मागणी व त्या मानाने अपुरा पुरवठा असल्यामुळे काही हॉटेल्स या काळात त्यांचे दर अवाजवी पद्धतीने वाढवतात आणि त्यातही जवळपास सगळ्या हॉटेल रूम्स कित्येक महिने आधीच बुक केलेल्या असतात.

आपल्या घरी एखाद-दुसरी अतिरिक्त रूम असेल किंवा आपल्या मालकीच्या इतर जागेत रिकामा फ्लॅट, मंगल कार्यालय, हॉल अशा ठिकाणी या बाहेरगावच्या धावपटू पाहुण्यांची एका रात्रीसाठी राहण्याची सोय करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. ही सेवा, सोय सातारकरांनी स्वत:च्या इच्छेनुसार नाममात्र शुल्क घेऊन किंवा अथवा मोफत करून देण्याचे आवाहन सातारा रनर्स फाउंडेशन व सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समिती यांनी केले आहे.


आरोग्य व तंदुरुस्तीच्या जागरासाठी अशा प्रकारची नावीन्यपूर्ण सामूहिक मोहीम राबविणारे सातारा हे देशातील, कदाचित जगातील पहिलेच शहर ठरेल. दिलदार सातारकर धावते पाहुणे आपल्या दारी या योजनेला भरभरून साथ देतील आणि सातारी पाहुणचार काय असतो हे जगाला दाखवून देतील, असा विश्वास आहे. - डॉ. संदीप काटे, संस्थापक

 

  • मॅरेथॉन स्पर्धेचा दिवस - रविवार, दि. ३ सप्टेंबर २०२३.
  • राहण्याची सोय केव्हा लागेल?
  • शनिवार दि. २ सप्टेंबर २०२३ या दिवशी व रात्री.
  • या मोहिमेत सहभागी कसे व्हावे?
  • याबाबत मदत करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी.

Web Title: For Satara hill marathon runners this year guests run to their homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.