वणव्याने हिरवीगार वनराई होतेय भस्मसात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:32+5:302021-04-02T04:41:32+5:30

पाचगणी : वणव्याने हिरवाईने नटलेली वनराई बेचिराख तर आश्रयस्थानात राहणाऱ्या सूक्ष्म जिवांसह अनेक वन्यजीव वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. पाचगणीलगतच्या ...

The forest is being burnt by the forest! | वणव्याने हिरवीगार वनराई होतेय भस्मसात!

वणव्याने हिरवीगार वनराई होतेय भस्मसात!

googlenewsNext

पाचगणी : वणव्याने हिरवाईने नटलेली वनराई बेचिराख तर आश्रयस्थानात राहणाऱ्या सूक्ष्म जिवांसह अनेक वन्यजीव वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. पाचगणीलगतच्या सर्वच डोंगररांगा सध्या वणव्यांनी काळ्याकुट्ट पडल्या आहेत; तर वणव्यासंबंधी वनविभाग तसेच सामाजिक संस्था करीत असलेल्या जनजागृतीचा वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींवर काडीचाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. याकरिता वनविभागाने अधिक सतर्क राहून या वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, अशी आर्त हाक पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

पाचगणी हे पर्यटनस्थळ जावळी व वाई तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे वाईच्या बाजूने पसरणी घाट गेल्या काही दिवसांत वणव्यामुळे जळून खाक झाला आहे. त्याचबरोबर खिंगर, आंब्रळ तसेच राजपुरी, कासवंड, घोटेघर, आखेगणी परिसरातील डोंगर दिवसरात्र वणव्यामुळे बेचिराख होऊन धुपत आहेत; तर या वनराईत राहणारे असंख्य वन्यजीवही मृत्युमुखी पडत आहेत.

चैत्र पालवी फुटलेल्या वनराईचीही या वणव्याच्या झळांनी राख झाली आहे. वनविभाग आणि सामाजिक संस्था अनेकदा जनजागृतीच्या माध्यमातून वर्षभर समाजप्रबोधन करीत असतात; परंतु याचा काहीच परिणाम या वणवा लावणाऱ्यांवर होत नाही. अनेक दुर्मीळ वनस्पती बेचिराख तर होतातच; त्याचबरोबर असंख्य सरपटणारे जीवजंतू मात्र कायमचे नष्ट होत आहेत.

चौकट :

वनराई धोक्यात...

पश्चिम घाट हा अनेक दुर्मीळ वनस्पती आणि अज्ञात अशा जीवजंतूच्या सहवासाने बहरलेला आहे. त्यातील कितीतरी दुर्मीळ वनस्पती व प्राणिमात्रांच्या ओळखी नाहीत. त्या योगायोगाने पुढे येत असतानाच विकृत लोकांकडून अशा घटना घडत असतात. त्यामुळे वनराई धोक्यात येत आहे.

कोट..

वणवा लावून वनसंपदेवर घाला घालणे हा मोठा गुन्हा आहे. त्याचबरोबर आपण करीत असलेल्या अपराधाने वनराईबरोबरच असंख्य जीवजंतू नष्ट करीत आहोत. याकरिता वन विभागाने कठोर कारवाई करीत त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे; तरच या विघ्नसंतोषी लोकांना जरब बसेल.

- दीपक चिकणे, पर्यावरणप्रेमी, पाचगणी

०१पाचगणी

पाचगणीलगतच्या सर्वच डोंगररांगा सध्या वणव्यांनी काळ्याकुट्ट पडल्या आहेत. (छाया : दिलीप पाडळे)

Web Title: The forest is being burnt by the forest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.