लोकसहभागातून बांधणार वनराई बंधारे
By admin | Published: October 13, 2015 10:08 PM2015-10-13T22:08:27+5:302015-10-13T23:56:46+5:30
विसापूर ग्रामसभेत निर्धार : जलयुक्त शिवाराच्या कामास प्रारंभ
पुसेगाव : खटाव तालुका दुष्काळी पट्यात मोडत असल्याने विसापूर हे गाव देखील अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. गावच्या पश्चिम, दक्षिण बाजूस डोंगर, पठार व गावओढा, रामओढा व नाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरला जावा, याकरीता महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विसापूर ग्रामपंचायत व लोकसहभागातून गावओढ्यावर वनराई बंधारा करुन कामास सुरुवात करणार आहे, अशी माहिती सरपंच सागर साळुंखे यांनी दिली.विसापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच पै. सागर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहाला श्री हनुमान मंदिरात सुरु झाली. ग्रामपंचायत सदस्य शहाजी साळुंखे यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर शितोळे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार कशापध्दतीने दिला जातो, याविषयी माहिती दिली. रोजगार हमी योजनेतंर्गत मजुराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे करता येते. त्यासाठी १ लाख २५ हजार रुपये तर फळबाग लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये या दरम्यान निधी मिळत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, यामुळे मजुरांना कामही मिळेल. पाणलोट कामाविषयी कृषी अधिकारी एस. के. जगदाळे माहिती दिली, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, तलाठी एच. आर. बाबर आरोग्य सेवक देशमुख यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली. आरसीसी गटर, पाणी पुरवठा, पाणंद रस्ते यासह विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच सागर साळुंखे म्हणाले की, ‘यावर्षी पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून अडविले जावे, याकरीता शासन व प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून त्यामध्ये विसापूरचा समावेश आहे. या योजनेतून एका सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये पाणीसाठी चांगला झाला आहे. जिल्हाधिकारी व प्रांत यांच्याकडे जलयुक्तमधून ४ सिमेंट बंधारे तसेच कृषी विभागाचे जुने ६ दगडी सिमेंट बंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची दुरूती व पाझर तलावाची उंची व गळत काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून निधी मिळावा. याकरीता मागणी करणार आहे. गावातील गटतट विसरुन गावच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)
‘राजस्व’ अभियानातून दाखले देणार
‘राजस्व’ अभियानातून विद्यार्थ्यांना जातीचे, डोमासाईल, दाखले, रेशनिंंगकार्डसह विविध दाखले देण्याची व्यवस्था महसूल विभागाच्या माध्यमातून केली जाईल. महात्मा गांधी जयंती सप्ताह व जलयुक्त चे औचित्य साधून यापुढील काळात लोकसहभागातून वनराई बंधारा व तलावातील गाळ काढण्याची कामे लोकवर्गणी व लोकसहभागातून केली जातील. वनराई बंधारा केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी व युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा.