सिमेंटच्या जंगलातही खुणावतोय सह्याद्रीतील रानमेवा !
By admin | Published: April 10, 2017 02:22 PM2017-04-10T14:22:16+5:302017-04-10T14:22:16+5:30
दहा रुपये मापटं : कास, जावळीतील दुर्गम भागातून काळीमैना साताऱ्याच्या बाजारात
आॅनलाईन लोकमत
पेट्री, जि. सातारा, दि. १0 : शाळांना सुट्या लागल्यानंतर झाडांवर चढणं, काळीमैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं असलं रानमेवा खाणं खेड्यांतील मुलांना सहज शक्य आहे. पण शहरी संस्कृतीत ते हद्दपार होऊ लागले आहे. सातारा, जावळी तालुक्यांतील दुर्गम भागातील शेतकरी रानमेवा साताऱ्याच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे सिमेंटच्या जंगलातील मुलांची हौस फिटत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. या रानमेव्याचा आस्वाद पर्यटकांबरोबरच सातारा, महाबळेश्वरसारख्या बाजारपेठेत येणारेही घेऊ लागले आहेत. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळू लागला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी , महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर तोरणे, आंबुळगी, करवंदे, आळू, जांभूळ, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून मे-जूनपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतो. हा रानमेवा बाजारपेठेत पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. परिसरात फिरावयास येणारे अनेक पर्यटक या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
वेली, झुडपात येणारे आंबुळगी हे फळ फेब्रुवारी, मार्चमध्ये पिकण्यास सुरुवात होते. त्यानंतर तोरणे, जांभूळ, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. तोरणे हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज वर्गीय फळही पिकण्यास सुरुवात झाली आहे. हे फळ पांढऱ्या रंगाचे असूून, चवीला गोड व साधारण तुरट असते. फळांचा आकार लहान मण्याएवढा असतो. तसेच अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. काही ठिकाणी करवंदे पिकण्यास सुरुवात झाली आहे.
पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक, नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग, जावळी तालुक्यातील कास-बामणोली व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे, जांभूळ यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात. पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात.
सततचे आभाळ तसेच वातावरणातील तीव्र उष्णता यामुळे झाडांना आलेला मोहोर जळून जाणे, तसेच मोहोर जास्त प्रमाणात गळून गेल्याने गतवषीर्पेक्षा यंदा रानमेवा असलेल्या फळांचे प्रमाण कमी आहे.