वन विभागाने घेतला बिबट्याचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:04+5:302021-01-10T04:31:04+5:30
दरम्यान, युवकावर हल्ला केलेला बिबट्या हा बछडा असावा तसेच त्याच्यासोबत आणखी एक बछडा असावा, असा वन विभागाचा कयास आहे. ...
दरम्यान, युवकावर हल्ला केलेला बिबट्या हा बछडा असावा तसेच त्याच्यासोबत आणखी एक बछडा असावा, असा वन विभागाचा कयास आहे. घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना बिबट्याच्या दोन बछड्यांच्या पायाचे ठसे आढळले आहेत. मात्र, मादी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आलेले नाहीत.
शेडगेवाडीतील ऋषिकेश थोरात हा युवक शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून शतपावलीसाठी घराजवळ असणाऱ्या प्राथमिक शाळेकडे गेला. तेथून परत येत असताना लघुशंकेसाठी मार्गाकडेला उभा राहिला. त्यावेळी अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऋषिकेशवर झेप घेतली. उजव्या मांडीला दाताने, तर उजव्या हाताला दोन ठिकाणी पंजाने जखमी केले. ऋषिकेशने मोठ्याने आरडाओरडा केला. नातेवाइकांसह परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. सर्वांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून नजीकच्या शिवारात धूम ठोकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी दाखल झालेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. शनिवारीही शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, घटनास्थळ वगळता इतर कोठेही त्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत.
सातारचे सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे, मल्हारपेठ वनपाल संजय भाट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून ठसे संकलित केले.
- चौकट
शिवारात वावरणाऱ्यांमध्ये भीती
बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर विहे, शेडगेवाडीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवारात मुक्कामी असणारे ऊसतोड कामगार, शाळू राखण करणारे, भांगलण करणाऱ्या मजूर महिला, गुराखी, रात्रपाळीवर पाणी पाजणाऱ्या मंडळींनी धसका घेतला आहे.
- चौकट
ग्रामस्थांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट
शेडगेवाडीचे सरपंच संतोष शेडगे, विहे गावचे उपसरपंच अविनाश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी वन अधिकारी विलास काळे यांची भेट घेतली. ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
फोटो : ०९ऋषिकेश थोरात
कॅप्शन : जखमी ऋषिकेश थोरात
फोटो : ०९केआरडी०७
कॅप्शन : शेडगेवाडी (ता. पाटण) येथील शिवारात वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी पायाच्या ठशांवरून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. (छाया : सुनील साळुंखे)
फोटो : ०९केआरडी०८
कॅप्शन : शेडगेवाडी (ता. पाटण) येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शनिवारी सायंकाळी वन विभागाने पिंजरा लावला. (छाया : सुनील साळुंखे)