माण तालुक्यात वनविभागाने झाडे लावली; पाण्याविना कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:18 PM2018-07-22T23:18:10+5:302018-07-22T23:18:14+5:30
पळशी : माण तालुक्यात शासनाच्या वतीने गतवर्षीच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा वनविभागाच्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे फज्जा उडाला असून, लागवड केल्यानंतर पिंजरे न बसवल्याने दुसºयांच दिवशी
मोकाट जनावरांनी झाडे फस्त केली आहेत.
झाडांची लागवड करण्याबरोबर झाडांना पाणी न दिल्याने झाडे जळू लागली असून, आताच शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत आहे. वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत राज्य शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उद्दिष्टामध्ये सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने कंबर कसली असली तरी माण तालुक्यात नुकतीच लागवड केलेल्या वृक्षांची झाडे दुसºयाच दिवशी मोकाट जनावरांनी फस्त केली तर जनावरांपासून वाचलेली झाडे पाण्यावाचून जळून चालली
आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनपट अधिक वृक्षलागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून, सर्व विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था आणि काही नागरिकही पुढे येत असून, जुलै महिन्यात ही वृक्षलागवड मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात यश गाठेल, असा विश्वास असतानाच माण तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने २२ ठिकाणी ७५,७१९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. १ जुलैपासून वृक्षांची वनविभागाने वाजत-गाजत लागवड ही केली आहे. काही ठिकाणी लागवड करताना फोटोसेशन ही अधिकाºयांनी केले; मात्र याच बेफिकीर अधिकाºयांनी अपुरे खड्डे काढणे, जळालेल्या झाडांची लागवड करणे, झाडांना पिंजरे न बसवणे, काही ठिकाणी खड्डेच न काढणे अशा अनेक बेजबाबदार कारणाने ही वृक्षलागवड कार्यक्रम फोल ठरला असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकरणाची वन खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी सखल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे.
माहिती देण्यास वनक्षेत्रपालांची टाळाटाळ !
माणच्या वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले यांना खड्ड्यांचे आकारमान किती ? एक खड्डा काढण्यासाठी किती खर्च आला? झाडे लागवड करण्यासाठी किती रक्कम? पिंजरा घेण्यासाठी किती रक्कम? अशी माहिती व अन्य माहिती शासन निर्णयाप्रमाणे मागितली असता त्यांनी माझं नवीन पोस्टिंग आहे. मला माहीत नाही. तुम्ही अर्ज द्या, तुम्हाला माहिती घेऊन देते,’ असे सांगितले; परंतु त्यांनीच ही सर्व वृक्षलागवड करून घेतली असून, त्यांना माहीत नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.