गमेवाडीच्या पठारावर होणार वन पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:55+5:302021-03-04T05:13:55+5:30

तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील गमेवाडी येथील निसर्गरम्य कुशीत असलेल्या प्राचीन जटेश्वर मंदिराचा वनपर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज ...

Forest tourism will take place on the plateau of Gamewadi | गमेवाडीच्या पठारावर होणार वन पर्यटन

गमेवाडीच्या पठारावर होणार वन पर्यटन

Next

तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील गमेवाडी येथील निसर्गरम्य कुशीत असलेल्या प्राचीन जटेश्वर मंदिराचा वनपर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. २०२१-२२ ते २०२३-२४ पर्यंतचा हा विकास आराखडा तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव साताऱ्याच्या उपवनसंरक्षकांकडून डिसेंबर महिन्यात कोल्हापूरच्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, वन विभागाकडून हा आराखडा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात येणार असून त्यामध्ये या आराखड्यास निधीची तरतूद झाल्यास जटेश्वर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे गमेवाडीसह तांबवे विभागातील जनतेचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड तालुक्याच्या वन परिक्षेत्रात तांबवे विभागातील गमेवाडीच्या हद्दीत प्राचीन जटेश्वर मंदिर आहे. प्राचीन काळात पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले. सूर्योदय झाल्यामुळे ते मंदिराचे शिखर बांधू शकले नाहीत, अशी आख्यायिका आहे. देवदर्शनासाठी येणाऱ्यांची व पर्यटकांची येथे नेहमीच ये-जा सुरू असते. या वनपर्यटनाचा विकास झाल्यास येथील निसर्गसंपदेचे संरक्षण, संवर्धन होऊ शकते आणि वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात होऊ शकते, हे ओळखून या ठिकाणी वन पर्यटनाला चालना देण्याची मागणी सातत्याने होत होती. म्हणून गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. तसेच सातारा व कऱ्हाड वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्तपणे सर्व्हे करून आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कऱ्हाड वन विभागाकडून जटेश्वर वनपर्यटन विकास आराखडा तयार करून तो साताऱ्याच्या उपवनसंरक्षकांना, तर उपवनसंरक्षकांकडून कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांना डिसेंबर महिन्यातच सादर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आराखड्यातील कामांसाठी २०२१-२२ साठी २७४.१८ लाख, २०२२-२३ साठी २६०.१८ व २०२३-२४ साठी २४३.४६ लाख रुपये निधीची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे.

- चौकट (फोटो : ०३केआरडी०१)

पठारावरील आकर्षण

१) भैरवनाथ मंदिर

२) अश्वत्थामा मंदिर

३) गोरक्षनाथ मंदिर

४) तळीपठार

५) नैसर्गिक तळी

६) धबधबे

७) रेखीव सूर्योदय, सूर्यास्त

८) विविध औषधी झाडे

९) कोयना नदीचा ‘सी पॉइंट’

१०) वन्यप्राणी, पक्षी, कीटक

- चौकट

आराखड्यानुसार हे होणार

वनतळे, गाळ काढणे, पॅगोडा, रेलिंग तयार करणे, फेरोक्रेट स्वागत कमान, पाण्याची टाकी, पाईपलाईन, मजूरकुटी, निसर्गपथावरील पायऱ्या, निरीक्षण मनोरे, लाकडी आभासाचे पूल, नक्षत्र वन / वनौषधी लागवड, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती, झाडांना दगडी कट्टे, निसर्ग पायवाटा, सौर पथदिवे, बायोडाजेस्टर टॉयलेट बसविणे, फेरोक्रेट बेंचेस बसविणे, कचराकुंड्या, चित्ररूप माहितीफलक बसविणे, उंच रोपांची लागवड, संरक्षक भिंत, रोपवाटिका, आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

- चौकट

दरवर्षी दीड लाख पर्यटकांची भेट

पांडवकालीन जटेश्वर मंदिर व प्रसिद्ध भैरवनाथ मंदिराच्या परिसरात दरवर्षी देवदर्शन व पर्यटनासाठी सुमारे दीड लाखांवर पर्यटक भेट देतात. त्यामुळे हे ठिकाण वनपर्यटन म्हणून विकसित केल्यास पर्यटकांची संख्या २० ते २५ टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळून जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन होईल. तसेच वर्षाला पाच लाखांपेक्षा अधिक महसूल जमा होईल.

फोटो : ०३केआरडी०२

कॅप्शन : गमेवाडी (ता. कऱ्हाड) येथील पठारावरून कोयना नदीचा मनमोहक सी पॉइंट दिसून येतो.

Web Title: Forest tourism will take place on the plateau of Gamewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.