युवकांसह वनकर्मचाऱ्यांनी विझविला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:09+5:302021-02-15T04:34:09+5:30
परिसरात वनक्षेत्राला लागूनच असलेल्या मालकी क्षेत्रात उन्हाळ्याच्या तोंडावर गवत पेटविण्यात येत असल्याने वणव्यांची समस्या डोके वर काढते. अलीकडे वनविभागाने ...
परिसरात वनक्षेत्राला लागूनच असलेल्या मालकी क्षेत्रात उन्हाळ्याच्या तोंडावर गवत पेटविण्यात येत असल्याने वणव्यांची समस्या डोके वर काढते. अलीकडे वनविभागाने हाती घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे असे प्रकार कमी झालेले असले तरी अधूनमधून ते घडतच आहेत. वरेकरवाडी जवळच्या डोंगर पठारावरील मालकी क्षेत्रात चार दिवसांपूर्वी दुपारी दीडच्या सुमारास वणवा पेटल्याचे समजताच तेथील माजी सैनिक विक्रम वरेकर, सुरेश टोळे, आनंदा वरेकर, सतीश वरेकर आदींसह नऊ-दहा मुलांनी त्या दिशेने धाव घेऊन झाडांच्या डहाळ्यांच्या साह्याने वणवा विझवायला सुरुवात केली.
वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. व्ही. डुबल, मुबारक मुल्ला, अजित कुंभार, अनिल पाटील आदी कर्मचारीही ब्लोअर मशीनसह तेथे दाखल झाले. चार तासांच्या संयुक्त प्रयत्नांनी वणवा विझविण्यात यश आले.
- चौकट
सशांसह पिलांना मिळाले जीवदान
वेळीच वणवा विझविण्यात आल्यामुळे जवळच असलेल्या पवनचक्क्या आणि वनक्षेत्र बचावले. वणवा भडकल्यानंतर उंच गवतात वास्तव्यास असलेले ससे व त्यांची पिल्ले सैरभर झाली होती. आपण स्वत: तसेच सहकाऱ्यांनी त्यांना वाचवून जीवदान दिल्याचे माजी सैनिक विक्रम वरेकर यांनी सांगितले.
- कोट
साधारणपणे पाच हेक्टरचा परिसर वणव्याने व्यापलेला होता. उंच कड्याचा भाग असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे जिवावर बेतणारे होते. मात्र, सामुदायिक प्रयत्नाने ते शक्य झाले.
- विक्रम वरेकर
माजी सैनिक, वरेकरवाडी
फोटो : १४केआरडी०१
कॅप्शन : वरेकरवाडी, ता. पाटण येथे पवनचक्क्यांच्या दिशेने सरकणारा वणवा विझविण्यासाठी युवकांनी अथक परिश्रम घेतले.