वनपालाचा जैवविवधेवर अभ्यास -। कास पुष्पपठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 07:27 PM2019-10-05T19:27:14+5:302019-10-05T19:29:43+5:30
पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सागर चव्हाण ।
पेट्री : फुलांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कास पठारावरील दुर्मीळ वनस्पती, फुलांचा वनपाल श्रीरंग शिंदे हे चौदा वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनी चार वर्षांपूर्वी पुष्पवैभवावर लिहिलेल्या दोन सचित्र पुस्तकांचे यंदा इंग्रजीत अनुवाद होत आहे.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पठारावरील वनस्पती, त्यांचे गुणधर्म, फुलण्याच्या दिवसांची संपूर्ण माहिती त्यांना तोंडपाठ आहे.
श्रीरंग शिंदे हे १९८२ मध्ये वनविभागात रुजू झाले. त्यांनी तीन वर्षे वनमजूर, एकोणतीस वर्षे वनरक्षक व गेल्या पाच वर्षांपासून वनपालपदी कार्यरत आहेत. ते २००६ पासून सह्याद्री घाट, कास पुष्प पठारावरील अनेकविध जैवविविधतेचा अभ्यास करत आहेत. त्याचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके, पठारावर पर्यटकांना माहिती देण्यासाठी घडवलेले गाईड होय.
इंटरनेटवर एका क्लिकमध्ये जगाची सर्व माहिती उपलब्ध होते तसे वनपाल शिंदे यांना पठारावरील कोणत्याही वनस्पती व फुलांची माहिती विचारली असता काहीक्षणातच वस्तुनिष्ठ माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचा हातखंडा आहे. त्यासाठी ते सर्व माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.'
अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शन
अनेकविध वनस्पती, फुले कशी ओळखायची याचे बाळकडू आजोबा व आईकडून मिळाले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या शिंदे यांनी बामणोली ते तळदेव असा पायी प्रवास करून शिक्षण घेतले. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबवावे लागले. दुर्मीळ वनस्पती ओळखायची आवड असल्याने ते वनविभागात रुजू झाले. अभ्यासात उपवनसंरक्षक सुनील लिमये, सहायक वनसंरक्षक शिवाजीराव फुले, वनसंरक्षक एन. के. राव यांचे सहकार्य लाभले. २२ आॅक्टोबर २०१० मध्ये कास पठाराला भेट दिलेल्या अमेरिका व स्वीत्झर्लंडच्या शास्त्रज्ञांना कास पठाराबाबत माहिती देण्याची संधी त्यांना मिळाली होती.
२००३ ते २००५ या काळात महाबळेश्वर, कास, ठोसेघरसह १६ पठारांची माहिती देण्यासाठी नेमणूक झाली होती. आयुर्वेदाचार्य संजय लिमये यांच्यासोबत चार वर्षे विविध वनस्पतींचा अभ्यास केला. आत्तापर्यंत १३७ वनस्पतींचा अभ्यास झाला आहे.
- श्रीरंग शिंदे, वनपाल, वनविभाग
अनेक वनस्पती तज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत; परंतु वन कर्मचाऱ्यानेच पुस्तक लिहिण्याची घटना गेल्या चार वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली होती. पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, शंभर वनस्पतींची माहिती असलेले मोठे पुस्तक लिहिले आहे.
- सचिन डोंबाळे,