Satara: बिल मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी, पंचायत समितीमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:41 IST2025-02-19T17:40:22+5:302025-02-19T17:41:17+5:30
खासगी कंत्राटदाराच्या कामगारावर गुन्हा

Satara: बिल मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी, पंचायत समितीमधील प्रकार
सातारा : केलेल्या कामाच्या ११ लाख २० हजारांच्या बिलावर गटविकास अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका खासगी कंत्राटदाराच्या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर अनिल मोकाशी (रा. कण्हेर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश राजेंद्र जाधव यांच्या नावाची ४ लाख व ७ लाख २० हजारांची दोन बिले मंजुरीसाठी पंचायत समितीमध्ये आली होती. मात्र, या बिलावर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या खोट्या सह्या असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पंचायत समितीने या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
या समितीनेही या बिलावरील सही गटविकास अधिकाऱ्यांची नसल्याचे सांगितले. त्यानंतर पंचायत समितीमधील वरिष्ठ लेखा सहायक सचिन कुंभार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी संशयित शंकर मोकाशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक जैस्वाल या अधिक तपास करीत आहेत.
मंजुरीसाठी खटाटोप
संशयित शंकर मोकाशी हा एका कंत्राटदाराकडे काम करतो. त्यांची बिले घेऊन तो पंचायत समितीमध्ये नेहमी येत असतो. हे बिलसुद्धा तो अशाच प्रकारे घेऊन आला. मात्र, स्वत: गट विकास अधिकाऱ्यांची सही करून मंजुरीसाठी दिले. त्याचा हा बनाव अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. लवकर बिल मंजूर व्हावे, यासाठी त्याने हा शॉर्टकट मारला असल्याचे पोलिसांनी सांगितले.