निर्बंध शिथिल होताच वेळमर्यादेचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:47 AM2021-06-09T04:47:56+5:302021-06-09T04:47:56+5:30
जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार भाजीपाला, किराणा दुकाने दुपारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, हॉटेलच्या ...
जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार भाजीपाला, किराणा दुकाने दुपारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, हॉटेलच्या घरपोहोच सेवेसाठीही सूट देण्यात आली आहे. मात्र, कऱ्हाडसह परिसरात दुपारी दोन वाजल्यानंतरही काही दुकाने सुरूच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून चार दुकानदारांना दंड केला. तसेच संबंधित दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली.
अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली असतानाही अनेक जण विनाकारण फिरत असल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवरही कारवाईचे सत्र सुरू केले. मंगळवारी दिवसभरात शहरामध्ये २९ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला. ढेबेवाडी फाटा, कोल्हापूर नाका, भेदा चौक या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी सुरूच ठेवली आहे. नागरिकांसह व्यापारी व विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.