कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांचीही चाचणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:02+5:302021-04-02T04:41:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य विभागाची टीम आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कमी ...

Forgetting contact tracing; Five of the positive contacts were not tested | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांचीही चाचणी नाही

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील पाच जणांचीही चाचणी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य विभागाची टीम आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कमी पडू लागली आहे. गतवर्षीसारखी परिस्थिती यंदाही झाली असून, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर प्रशासनाला पडला आहे. या कारणाने आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर प्रशासनाने भर दिला तो कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यावर. गतवर्षी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग इतके जबरदस्त होते की, वेळ पडल्यास पोलिसांचा आधार घेऊन मोबाईल लोकेशनवरून संबंधितांचा संपर्क कोठे कोठे आला, याची माहिती घेतली जात होती. तसेच महसूल विभाग, शिक्षक, गावपातळीवरील कमिटी हे सर्वजण या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सहभागी झाले होते. परंतु यंदा याउलट परिस्थिती असून हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. खरं तर लसीकरणावर भर देण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचाही अवलंब होणे गरजेचे आहे. तरच ही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येईल.

चौकटः

दररोज पाचशे पॉझिटिव्ह... मात्र चाचण्या केवळ हजार

जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र त्या तुलनेत चाचण्या कमी होताना दिसून येत आहेत. आता रोज पाचशेच्या वर लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्यांचा वेगही वाढविणे गरजेचे आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यंत वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये चाचण्यांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोट :

चाचण्या आणि लसीकरणावर भर

गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. सध्या चाचण्यांवरही आणि लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी होईल.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चौकट :

हा घ्या पुरावा...

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून कसलाही शोध घेतला जात नाही. साताऱ्यातील शनिवार पेठमध्ये एक युवक कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तो युवक स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्याच्या घरातील इतर व आजुबाजूचे लोक त्याच्या संपर्कात आले होते. त्यांची कोणीच चौकशी केली नाही.

अशीच परिस्थिती साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरात झाली आहे. घरातील दोन सख्खे भाऊ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या घरामध्ये आठ लोक राहतात. या लोकांनीच आपापली काळजी घेऊन प्रशासनाला याची खबर दिली आहे. गतवर्षीसारखी कोणतीच काळजी न घेतल्यामुळे नागरिकांचा कोरोनाकडे बघण्याचा बिनधास्तपणा कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत असल्याचेही समोर येत आहे.

चौकट ः

एकूण कोरोना रुग्ण

६६०६३

गृह विलगीकरणातील रुग्ण

१०६३

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

३९३६

एकूण कोरोना बळी

१९१०

Web Title: Forgetting contact tracing; Five of the positive contacts were not tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.