सातारच्या धर्तीवर कराडमध्येही वाणिज्य घरपट्टी माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:38 AM2021-05-23T04:38:29+5:302021-05-23T04:38:29+5:30

कऱ्हाड : सातारा नगरपालिकेच्या धर्तीवर कराड नगरपालिकेने गतवर्षाच्या व या वर्षाच्या लॉकडाऊनमधील बंद असणाऱ्या वाणिज्य मिळकतींची घरपट्टी माफ करावी, ...

Forgive commercial landlords in Karad on the lines of Satara | सातारच्या धर्तीवर कराडमध्येही वाणिज्य घरपट्टी माफ करा

सातारच्या धर्तीवर कराडमध्येही वाणिज्य घरपट्टी माफ करा

Next

कऱ्हाड : सातारा नगरपालिकेच्या धर्तीवर कराड नगरपालिकेने गतवर्षाच्या व या वर्षाच्या लॉकडाऊनमधील बंद असणाऱ्या वाणिज्य मिळकतींची घरपट्टी माफ करावी, अशा आशयाचे निवेदन लोकशाही आघाडीचे नेते जयंत पाटील, विरोधी गटनेते सौरभ पाटील व नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देश होरपळत आहे. गेल्या दीड वर्षात नागरिकांचे जीवित व आर्थिक असे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन महिने देश पूर्ण लॉकडाऊनमध्ये होता. या कोरोनाकाळात आपण नगरपालिकेच्या माध्यमातून यथाशक्ती आरोग्य सेवा देत आहोत. पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी कराडकर नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहेत. परंतु, कोरोनाच्या प्रसारामुळे समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या संदर्भात आपण शहरातील नागरिकांची संपूर्ण घरपट्टी माफ होण्यासंदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तसा ठराव केला आहे व शासकीय मंजुरीस पाठवला आहे.

दरम्यान, नुकतेच सातारा नगरपालिकेने घरपट्टी माफ केल्याची बातमी वाचण्यात आली. या अनुषंगाने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून व नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम १२७ व कलम २४७च्या तरतुदींचा अभ्यास करता ज्या मिळकती शासकीय आदेश अथवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बंद असतील तर त्यांची घरपट्टी माफ करण्याचे अधिकार हे स्थानिक नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस आहेत, असे लक्षात येते. सदर अधिनियमांची प्रत सोबत जोडत आहोत.

सदर तरतुदींचा अभ्यास करून व आधार घेऊन मागील आर्थिक वर्षीच्या बंद काळातील कराडच्या वाणिज्य मिळकतींची घरपट्टी माफ होऊन सदर रक्कम चालू वर्षीच्या घरपट्टीमधून वजा होणेसंदर्भात व चालू आर्थिक वर्षीच्या बंद काळातील घरपट्टी माफ होण्यासंदर्भात आपण त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी, जेणेकरून कराडकर नागरिकांना काहीअंशी तरी दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी नगरसेवक मोहसीन आंबेकरी, सुहास पवार, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, पोपटराव साळुंखे, अनिल धोत्रे, रणजित पाटील, अमित शिंदे, रोहित वाडकर उपस्थित होते.

Web Title: Forgive commercial landlords in Karad on the lines of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.