पारंपरिकतेला फाटा; वैज्ञानिक पद्धतीने गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:15+5:302021-05-12T04:40:15+5:30

उंडाळे ता. कराड येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, ...

Fork to tradition; Homecoming in a scientific way | पारंपरिकतेला फाटा; वैज्ञानिक पद्धतीने गृहप्रवेश

पारंपरिकतेला फाटा; वैज्ञानिक पद्धतीने गृहप्रवेश

Next

उंडाळे ता. कराड येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, वनवा विरोधी मोहीम, जटा निर्मूलन, ग्रंथ चळवळ असे अनेक समाजोपयोगी उपक्रम ते सतत राबवत असतात. येथील क्रांती ग्रुपच्या माध्यमातून युवकांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन, ग्रंथालयाचे संवर्धन, काव्यवाचन स्पर्धा, गणेशोत्सवात समाज जागृतीचे उपक्रम राबवत त्यांनी आपला समाज परिवर्तनाचा लढा अखंड सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर शिक्षक म्हणून काम करीत आपले ज्ञानदानाचे कार्यही सुरू ठेवले आहे.

शिवम् प्रतिष्ठानचे डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांच्या उच्च करिअरसाठीही त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. अशा प्रकारे समाज परिवर्तनासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पाटील यांनी नुकतेच घर बांधले. घराचे बांधकाम पूर्ण होताच त्यांनी त्यांच्या सामाजिक विचारसरणीप्रमाणे ‘क्रांतिबन’ असे आपल्या बंगल्याचे नामकरण केले. या घराचा वास्तुशांत समारंभ पारंपरिक पद्धतीने न करता त्यावरील अनाठायी खर्च टाळून पैसा विविध सामाजिक संस्थांना मदत म्हणून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यानुसार धार्मिक विधीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा व पुस्तके यांची पूजा मांडण्यात आली. माती, बियाणे, वृक्ष, यांचे पूजन करून वास्तुशांत समारंभ करण्यात आला. भारतीय संविधानाचे वाचन करून गृह प्रवेश केला.

या वेळी डॉ. सुधीर कुंभार, माजी प्राचार्य बी. पी. मिरजकर, धनंजय पवार, सुहास प्रभावळे, महादेव पाटील, सुप्रिया पाटील, सारिका पाटील, सुनील पाटील व कुटुंबीय यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. वास्तुशांत समारंभाचा खर्च होणाऱ्या पैशातून १० सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपये मदत करण्यात आली. तसेच पाच विद्यार्थी शाळेसाठी दत्तक घेतले आहेत. अशा प्रकारे जुन्या रूढी-परंपरेला फाटा देत समाज परिवर्तनाचा संदेश देणारा हा आगळावेगळा वास्तुशांत समारंभ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

फोटो : वास्तुशांत समारंभासाठी मांडलेली पूजा.

Web Title: Fork to tradition; Homecoming in a scientific way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.