‘बांधकाम’चा पुन्हा मलमपट्टी ‘फॉर्म्युला’

By admin | Published: June 21, 2015 09:50 PM2015-06-21T21:50:16+5:302015-06-22T00:25:26+5:30

आगाशिवनगर रस्त्याचे त्रांगडे : चौपदरी रस्त्याचे सुशोभीकरण रखडले; चार वर्षांत डांबरीकरणही नाही, ठरावाला केराची टोपली

'Formation' again 'bandage' Formula | ‘बांधकाम’चा पुन्हा मलमपट्टी ‘फॉर्म्युला’

‘बांधकाम’चा पुन्हा मलमपट्टी ‘फॉर्म्युला’

Next

मलकापूर : ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन सहा वर्षे झाली. हे रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतानाही गेल्या सहा वर्षांत कोणतीही देखभाल दुरुस्ती केली गेलेली नाही. संपूर्ण उन्हाळा उलटून गेला; मात्र डांबरीकरणही केले नाही व दुभाजकातील सुशोभीकरणही झाले नाही. अशातच बांधकाम विभागाने पुन्हा एकदा या रस्त्यावरील केवळ खड्डे मुजविण्याचेच लक्षण दाखवले आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या आगाशिवनगर मधील दोन किलोमीटरच्या पट्ट्याच्या रुंदीकरणासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २ कोटी ४० लाख निधी दिला होता. केवळ २.२ किलोमीटर साठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊनही निधीच्या प्रमाणात आवश्यक तेवढे दर्जेदार काम झाले नाही. या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी मनोहर शिंदेंसह नगरसेवकांनी नगरपंचायत सभेत ठराव करून घेतला. तसा बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही केला. मात्र ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या म्हणीनुसार गेली चार वर्षे कोणतीही उपाययोजना केलेली नाही. केवळ रस्त्याला पडलेले खड्डे मुजविण्याचेच काम करण्याकडे भर दिला जात आहे. या बांधकाम विभागाच्या उदासीनतेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुंदीकरणावेळी रस्त्याला दुभाजक निर्माण केला आहे. या दुभाजकात नगरपंचायतीने पथदिवेही बसवले आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी सुशोभीकरणासाठी दुभाजकात मातीही भरण्यात आली होती. मात्र, आजतागायत या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यात आले नाही. त्यामध्ये वाढलेले गवतही विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान नगरपंचायतीच्या वतीने एकदाच काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेले फूटपाथ वेल झाडींनी व्यापलेले आहेत. याची स्वच्छता करण्याकडेही बांधकाम विभाग दुर्लक्षच करत आहे. किमान या पावसाळ्यात तरी दुभाजकाचे सुशोभीकरण होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

डासांचा प्रादुर्भाव...
आगाशिवनगर रस्त्याच्या रुंदीकरणानंतर दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील गटारांची गेल्या सहा वर्षांत साफसफाई कोणीही केलेली नाही. या नाल्याची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे साफसफाईसाठी कोणीही फिरकत नाही. ठिकठिकाणी नाले तुंबल्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.


दुभाजक, नालाच नाही
इमर्सन कंपनी ते महिला उद्योग या पट्ट्यात गेल्या सहा वर्षांत दुभाजक बनवण्यात आले नाहीत. त्याचबरोबर रुंदीकरणाचा निधी एवढा भरमसाठ असतानाही याच पट्ट्यातील रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस नालाही व फूटपाथही बनवलेला नाही. या भागातील सांडपाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे.

फूटपाथची दुरवस्था
रस्त्याच्या रुंदीकरणावेळी पादचाऱ्यांना रस्त्यावरील वाहनाचा त्रास होऊ नये म्हणून फूटपाथची निर्मिती करण्यात आली आहे. मुळातच फूटपाथ बनवतानाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे त्याचा वापरच होत नाही. अनेक ठिकाणी तोडफोड झाली असून, काही ठिकाणी मातीचे व कचऱ्याचे ढीग टाकल्यामुळे फूटपाथची दुरवस्था झाली आहे.

Web Title: 'Formation' again 'bandage' Formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.