‘रयत’च्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख
By प्रगती पाटील | Updated: July 3, 2023 17:06 IST2023-07-03T17:05:51+5:302023-07-03T17:06:15+5:30
संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी मिळाली

‘रयत’च्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख
सातारा : आशिया खंडातील सर्वांत माेठी समजल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची साताऱ्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी आजपर्यंत संस्थेमधील प्राचार्य यांची निवड केली जात असे. यंदा प्रथमच संस्थेच्या कार्याध्यक्षपदी ९ मे रोजी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची आणि सोमवारी (दि. ३) माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांची सचिवपदी निवड ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी सनदी अधिकाऱ्यांना संस्थेचे पदाधिकारी हाेण्याची संधी मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या संघटकपदी डाॅ. अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या मॅनेजिंग काैन्सिल बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. डाॅ. पाटील हे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू आहेत. त्यांनी संस्थेत कार्याध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेच्या एकूण गुणवत्तावाढीत त्यांचा माेलाचा वाटा आहे.