साताऱ्यातील माजी नगरसेवक बाळू खंदारेला अटक
By दत्ता यादव | Published: February 27, 2023 10:28 PM2023-02-27T22:28:24+5:302023-02-27T22:29:01+5:30
प्राणघातक हल्लाप्रकरण; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पिस्तूल दाखवून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताच माजी नगरसेवक बाळू खंदारे हा शहर पोलिस ठाण्यात सोमवारी स्वत:हून हजर झाला. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सनी भोसले (रा. सातारा) हा मित्रांसमवेत तालीम संघावरून जात असताना कारमधील काही तरुणांनी माजी नगरसेवक बाळू खंदारे याच्या कार्यालयाकडे बघून शिवीगाळ केली होती. यावरून माजी नगरसेवक बाळू खंदारे याने सनी भोसले याला फोन करून त्याचा जाब विचारत त्याला तालीम संघावर बोलावून घेतले. यावेळी खंदारेसह त्याच्या साथीदारांनी सनी भोसले व त्याच्या सहकाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना ८ सप्टेंबर २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी बाळू खंदारेसह एकूण १५ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, बाळू खंदारे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने खंदारे याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. गेल्या दीड वर्षापासून यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. काही दिवसांपूर्वी खंदारेचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे तो सोमवारी दुपारी सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
युक्तिवादावेळी अचंबित करणारे किस्से चर्चेला...
न्यायालयात युक्तिवादावेळी काही अचंबित करणारे किस्से चर्चेला आले. या प्रकरणातील संशयितांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या केबिनचा खर्च केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे पोलिसांचे या संशयितांना अभय होते, असा आरोपही झाला. युक्तिवादाच्या निमित्ताने नव्यानेच हे प्रकरण समोर आल्याने तो अधिकारी कोण, अशी चर्चा आता पोलिस दलात रंगली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"