पार्किंगच्या कारणावरून साताऱ्यातील माजी नगरसेवकाचा हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:09 AM2019-11-22T00:09:04+5:302019-11-22T00:10:21+5:30
सातारा : पार्किंगच्या कारणातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयित माजी नगरसेवक महेश जगताप (रा. सदर बझार, सातारा) यांना पोलिसांनी रात्री ...
सातारा : पार्किंगच्या कारणातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयित माजी नगरसेवक महेश जगताप (रा. सदर बझार, सातारा) यांना पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या बंगल्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. दरम्यान, अधिक चौकशी करून संशयितांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती घटनास्थळी आलेल्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगरसेवक महेश जगताप यांचा सदर बझारमध्ये बंगला आहे. तेथील बंगल्यासमोरीलच पार्किंग व इतर किरकोळ कारणावरून जगताप यांनी एकाला मारहाण केली. तसेच हवेत गोळीबार केला. यावेळी त्यांच्याबरोबर अन्य एक संशयित होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस महेश जगताप यांच्या सदर बझारमधील बंगल्याजवळ पोहोचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक विजय कुंभार घटनास्थळी आले. त्यांच्याबरोबर पोलीस बंदोबस्तही होता. त्यानंतर बंगल्यात जाऊन जगताप यांच्याकडे चौकशी केली. रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिसांनी जगताप यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘पार्किंगच्या व इतर किरकोळ कारणातून हवेत गोळीबार झाल्याने आम्ही आलो होतो. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसºयाचा शोध सुरू आहे. अधिक चौकशी केल्यानंतर सर्व चित्र समोर येईल.’