माजी उपसभापतीच्या मुलाचा करणार होते खून, चौघांना अटक; हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:17 PM2023-07-12T22:17:35+5:302023-07-12T22:18:07+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील प्रीतम पाटील हा बेलवडे हवेली गावच्या हद्दीतील हॉटेल आनंद चालवितो. त्याच्या हॉटेलवर ७ जुलै रोजी शिरवडे येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता.
कऱ्हाड : हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाल्यानंतर हॉटेलची तोडफोड करून जाणाऱ्याचा खून करण्याचा कट चौघांनी रचला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा हा डाव फसला. रात्रगस्त पथकाने संबंधित चौघांना कुऱ्हाड, कोयता, चाकू अशा धारदार शस्त्रांसह ताब्यात घेऊन अटक केले. तासवडे (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
प्रीतम चंद्रकांत पाटील (३१), सागर अशोक पवार (३५), किरण मोहन पवार (३१, तिघेही रा. वहागाव, ता. कऱ्हाड) व ऋषिकेश अशोक पाटील (२२, रा. येणके, ता. कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, आरोपी ज्या युवकाचा खून करणार होते. तो युवक कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहागाव येथील प्रीतम पाटील हा बेलवडे हवेली गावच्या हद्दीतील हॉटेल आनंद चालवितो. त्याच्या हॉटेलवर ७ जुलै रोजी शिरवडे येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी आयुष बोराटे व हॉटेल चालक प्रीतम पाटील यांच्यात जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला. त्यावेळी आयुष याने त्याचा भाऊ वेदांत तसेच बाळू यादव यांना बोलावून आनंद हॉटेल व दुचाकीची मोडतोड केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. हा राग मनात धरून हॉटेल चालक प्रीतम पाटील तसेच त्याचा मित्र सागर पवार, किरण पवार, ऋषिकेश पाटील यांनी १० जुलै रोजी हॉटेल आनंद येथे एकत्र येऊन आयुष बोराटे याच्या खुनाचा कट रचला. यावेळी हॉटेलमध्ये असणारी कुऱ्हाड, चाकू, कोयता घेऊन दुचाकीच्या नंबरप्लेटला त्यांनी राख व माती लावून नंबर बुजवला. चौघे त्या दुचाकीवरून शिरवडे येथे जात असताना रात्रगस्तीवर असणारे तळबीड पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदार वाघमारे व चालक पाटील यांना बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मध्यरात्री २ वाजता हे आरोपी दिसले. त्यावेळी महिला पोलिस हवालदार वाघमारे यांना संशय आल्यामुळे त्यांनी आरोपींना थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी दुचाकी न थांबवता भरधाव निघून गेले. पोलिसांनी पाठलाग करून तासवडे टोलनाक्याजवळ औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या मार्गावर आरोपींना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आयुष सुहास बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे अधिक तपास करीत आहेत.
धारदार शस्त्र हस्तगत
पळून जात असताना आरोपींनी त्यांच्याजवळील कुऱ्हाड, चाकू व कोयता महामार्गानजीक एका झाडाजवळ टाकून दिला होता. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ती शस्त्रे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी शस्त्र जप्त केली आहेत.