अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

By Admin | Published: May 28, 2015 12:48 AM2015-05-28T00:48:29+5:302015-05-28T00:56:28+5:30

रामराजे नाईक-निंबाळकर : वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र

Former minister is responsible for the incomplete plans | अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

googlenewsNext

वाठार स्टेशन : ‘वाठार स्टेशन गावचा रखडलेला पाणी प्रश्न सोडवण्याची धमक ही केवळ राष्ट्रवादी नेतृत्वाकडेच असून हा पाणी प्रश्न आम्ही सोडवतो फक्त आम्ही आणलेलं पाणी गावकऱ्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना पाजण्याची भूमिका घ्यावी व या गावाला मिळालेली सभापती पदाची उंची वाढवावी,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा घणाणात ही त्यांनी केला.
वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील कोरेगाव पंचायत समितीचे पहिले सदस्य रघुनाथ जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा तसेच जिल्हा बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन काका पाटील, सभापती रुपाली जाधव, जि. प. सदस्य सतीश धुमाळ, किरण साबळे, रामभाऊ लेंभे, एस. आर. भोईटे, बाळासाहेब सोळस्कर यांची उपस्थिती होती.
यावेळी वसना-वांगना पाणी योजनेबाबत बोलताना रामराजे म्हणाले वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. या योजनेसाठी आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आज या दोन्ही योजना पूर्ण झाल्या असत्या.
मुख्यमंत्र्यांनी जिहे-कठापूर योजनेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे त्यांनी स्वागत करीत केवळ याच योजनेकडे न पाहता वसना वांगणा, टेंभू, ताकारी-म्हैसाळ या सिंचन योजनेला गव्हर्नरच्या आदेशाबाहेर ३७१ कलमाबाहेर काढण्याचे काम करावे.
वसना योजनेसाठी काही गावातील लोक अडमूठे धोरण राबवत आहेत. जर पाणी हवचं असेल तर जमिनीच्या माध्यमातून त्याग करण्याची भूमीका घ्यावी लागेल तरच वसनेच पाणी पुढं सरकेल.
राज्यातील असणाऱ्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात आता सर्वच पाणी योजना रखडणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पाणीच हवं असेल तर संघर्षाला तयार रहावे लागेल, असे आवाहन यावेळी केले.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सत्ता नसताना सत्ता मिळवणं हा मोठेपणा आहे. रामराजेंना मिळालेली सभापतीपदाची संधी जिल्ह्याच्या विकासकामांना गतीमान करेल. सहा महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारकडून यापुढे सर्वसामान्यांच्या आशा धुळीला मिळणार आहेत. मोदी सरकारचे अच्छे दिन आले. परंतु ते परराष्ट्रांना आल्याचे सांगत देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा सांभाळा मग दौरे काढा, असा टोला लगावला. जलयुक्त शिवार ही संकल्पना आमच्या सरकारने राबवली. मात्र आज याचे राजकीय भांडवल होत आहे. केवळ जिहे-कठापूर योजनेकडे लक्ष न देता जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच योजनांसाठी निकष लावावा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न आम्ही आपले सरकार सत्तेवर असतानाच सोडवला होता. परंतु येथील स्थानिक ग्रामपंचायतीच्या आडमुठी भूमिकेमुळे हा प्रस्ताव माघारी गेला. वाठार स्टेशनचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केली.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रघुनाथ जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वागत संभाजी यादव यांनी तर आभार पं.स. सदस्य अशोक लेंभे यांनी मानले. कार्यक्रमास अजय कदम, निलेश जगदाळे, शिवाजी पवार, प्रशांत पवार, शहाजी भोईटे, संभाजीराव धुमाळ, सुरेखा पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)


सोळस्करांवर रामराजेंची टोलेबाजी
‘वसना योजना वेळेत न केल्यास तुमचे सहकारी नेते आत्महत्या करतील,’ असा शाब्दिक टोला शशिकांत शिंदे यांना मारल्यानंतर रामराजे म्हणाले, ‘या भागात लिंबाची सर्व झाडे तोडा म्हणजे ही आत्महत्या रोखता येईल.’ यावर चांगलाच हशा पिकला. रामराजे पुढे म्हणाले, ‘बाळासाहेबांचे शशिकांत शिंदे आद्य गुरु आहेत. मी साईड गुरु आहे. त्यामुळे शिंदे साहेब आता सावध रहा. शिंदेसाहेब... बाळासाहेबांना तुमच्या बंगल्याशेजारी घर बांधून द्या.’ यावर शिंदे म्हणाले, ‘असं झालं तर ते मलाही घराबाहेर काढतील.’ एकूणच रामराजेंच्या भाषणातील बाळासाहेबांच्यावरील टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

Web Title: Former minister is responsible for the incomplete plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.