महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 10:00 PM2019-05-12T22:00:44+5:302019-05-12T22:06:26+5:30

न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

former nagaradhyaksha of mahabaleshwar booked for cheating | महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

पांचगणी : न्यायालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्षांसह एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे (रा.महाबळेश्वर) व नीलेश रामदास थोरात (रा.शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम ढेबे, बाळू गावडे, भगवान राजगे, राहूल कोंढाळकर, युवराज राक्षे या युवकांनी सातारा येथे पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानुसार  एकूण ३६  युवकांची फसवणूक झाली असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यात शांताराम धोंडिबा ढेबे (वय ४४, रा.कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘माझा मुलगा शुभम ढेबे याला कोर्टात क्लार्कची नोकरी लावतो, असे आमिष त्यांनी दाखवले. त्या बदल्यात रोख अडीच लाख आणि उरलेले अडीच खात्यात जमा करण्याचे मला आखाडे यांनी सांगितले. नोकरीच्या आशेने आम्ही  फोन करून आखाडे यांना विचारले असता त्यांनी महाबळेश्वर येथे बोलावले. आखाडे यांचे महाबळेश्वर येथील घरी गेलो असता, त्यांनी घरात बसलेल्या नीलेश थोरात यांची ओळख करून दिली. त्याने मीच तुमच्या मुलाला नोकरीला लावणार आहे, असे सांगितले. त्यावेळी शाळेची कागदपत्रे आणि रोख अडीच लाख रुपये आखाडे यांच्याकडे दिले. नंतर थोरात याचा मुंबईतील दिघी बँकेचा खाते क्रमांक  दिला. या खात्यावर राहिलेली अडीच लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. त्याशिवाय नोकरी मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर आम्ही घरी आलो. नंतर सातारा जिल्हा बँकेच्या भिलार शाखेतून ७०००० रुपये काढून त्या खातेवर पाठवले. तसेच भिलार येथील महाराष्ट्र बँकेतून १ लाख ८० हजार रुपये काढून ती ही रकम नीलेशच्या खातेवर भरली आहे.’ सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. एन. कापले व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: former nagaradhyaksha of mahabaleshwar booked for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.