पर्यटकांची वाहने महाबळेश्वरकडे : पर्यटन हंगामाच्या सुरुवातीस वाहतुकीची कोंडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:45 PM2019-11-02T19:45:33+5:302019-11-02T19:48:01+5:30
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामध्ये पर्यटकांच्या वाहने मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या दिवाळी हंगाम सुरू झाला असलातरी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. त्यामुळे ऐन हंगामामध्ये वाहतूक कोंडीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामास जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच गुजरात, महाराष्ट्र व इतर राज्यातून पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत; पण महाबळेश्वर व पॉर्इंट परिसरातील खराब रस्ते, वाहतुकीच्या नियोजनाचे तीन तेरा अशा अनेक अडचणींना पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामध्ये पर्यटकांच्या वाहने मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या दिवाळी हंगाम सुरू झाला असलातरी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. त्यामुळे ऐन हंगामामध्ये वाहतूक कोंडीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून महाबळेश्वर शहर व पॉर्इंटकडे येणाऱ्या-जाणाºया वाहतुकीचे, वाहनतळ, नो पार्किंग, एकेरी वाहतूक, दुहेरी वाहतुक, नो एन्ट्री याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून ते रात्री नऊपर्यंत ठिकठिकाणी पर्यटक व स्थानिक नागरिकांना वाहतुकीच्या रांगेत राहावे लागले.
महाबळेश्वर शहर व परिसरात काही ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. तर काही ठिकाणी एका बाजूस पार्किंग आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग केल्यामुळे स्थानिक नागरिकांनाही रांगेत उभे राहावे लागले. त्यात महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्ड्यांची भर पडलीय, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पाचगणी-महाबळेश्वर हे अंतर १९ किलोमीटरचे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी वाहतुक कोंडी व खड्डेमय रस्त्यामुळे तब्बल दोन तास लागत आहेत. दिवाळीच्या धामधुमीत शहरातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. तर परतीच्या पावसानंतर आता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पर्यटक व नागरिक हैराण झालेत. निवडणुकीच्या आधी तात्पुरते मुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले असून, त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. तर प्रशासनाविरोधात संतप्त भावना आहेत.
- हॉटेल गिरिविहारपासून ते मेढा नाकापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लिंगमळा धबधबा पॉर्इंटकडून येणारी वाहने तसेच सातारा आणि मेढामार्गे बसेस येतात; पण हॉटेल मायफेअर येथून गिरिविहारपर्यंत लहान रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा नवा त्रास चालू झाला आहे. स्थानिक नागरिकांमधून पोलीस प्रशासन व बांधकाम विभागाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
- दरवर्षी दिवाळी हंगामासाठी साताºयाहून २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली जाते; परंतु महाबळेश्वरसाठी यावेळी अवघे सातच कर्मचारी पाठवण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.
.........................................