मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने माजी सैनिकाची फसवूणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:26 AM2020-01-07T11:26:07+5:302020-01-07T11:27:29+5:30
बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल यशवंत पिलावरे (वय ४०, रा. काळाराम मंदिरासमोर जंगीवाडा मंगळवार पेठ, सातारा), प्रसाद विष्णूपंत धोत्रे (वय ५५, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), गायकवाड (पूर्ण नाव फिर्यादिला माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास किसन जाधव (वय ५६, रा. करंडी, ता. सातारा) हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहित याच्या नोकरीसाठी जाधव हे प्रयत्न करत होते. त्यांच्या गावातील दादा पिलावरे यांचा पुतण्या विशाल पिलावरे हा ओळखीचा झाला होता. त्याने सारस्वत बँकेत तुमच्या मुलाला नोकरीला लावतो. माझ्याकडे अशी पार्टी आहे, असे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैशाची तजवीज केली.
विशाल पिलावरेने विलास जाधव यांना गाडीतून मोळाचा ओढा येथे राहात असलेल्या प्रसाद धोत्रे याच्याकडे नेले. धोत्रे साहेब मंत्रालयात कामाला असतात. त्यांची ओळख आहे, यापूर्वी त्यांनी चार ते पाचजणांची कामे केली आहेत, असे पिलावरेने त्यांना सांगितले. त्यामुळे विलास जाधव यांनी त्यांना साडेपाच लाख रुपये दिले.
पैसे दिल्यानंतर तुमच्या मुलाला दोन महिन्यांत नोकरी लावून देतो, नोकरी नाही लागली तर पैसे परत देईन, असे सांगून त्याने आयसीआय बँकेचा धनादेशही जाधव यांच्याकडे दिला. परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतर जाधव यांनी पिलावरे आणि धोत्रे यांच्याकडे मुलाला नोकरी कधी लावणार, असे विचारले असता या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले.
काही दिवसानंतर तर त्यांचे फोन बंद झाले. विशाल पिलावरे हा जाधव यांना एके दिवशी राजवाड्यावर भेटला. त्यावेळी त्याने माझा मित्र गायकवाड याने धोत्रे यांना तुमच्या मुलाच्या नोकरीसंदर्भात चर्चा केली होती, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माजी सैनिक विलास जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.