गड राखला.. आता कुमक साताऱ्याकडे
By Admin | Published: September 23, 2016 11:41 PM2016-09-23T23:41:21+5:302016-09-23T23:58:17+5:30
मराठा बांधवांचा निर्धार : फलटणला आज नियोजन बैठक; सहभागी होण्याचे आवाहन
फलटण : फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केल्यानंतर आता फलटणमधील सकल मराठा समाज बांधवांनी सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा बांधव महामोर्चाच्या तयारीला लागले असून, या नियोजनासाठी शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी ठिक दहा वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा तसेच समाजाचे आभार व फलटण येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा सर्व तपशील, आढावा दिला जाणार आहे. तसेच सातारा येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी आवश्यक माहितीही या बैठकीत या बैठकीत दिली जाणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी या नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आदर्की परिसरातील आठ गावे एकवटली
४आदर्की : फलटणला काढण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा यशस्वी केल्यानंतर आता फलटण तालुक्यातील हिंगणगाव, सालपे, सासवड, बिबी, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, टाकोबाईचीवाडी, आळजापूर या गावांनी सातारा येथील मराठा महामोर्चात सहभागी होऊन हा महामोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आठ गावांमध्ये मराठा बांधवांकडून घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनीही ३ आॅक्टोबर रोजी शेतीची सर्व कामे बंद ठेवून महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
भादे येथे आज नियोजन बैठक
४भादे : सातारा येथे ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सातारा मराठा महामोर्चात सहभागी होण्यासाठी भादेसह परिसरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भादे येथील भैरवनाथ मंदिरात सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या बैठकीस मराठा बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
मायणीत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
४मायणी : सातारा येथे आयोजित सातारा मराठा महामोर्चाच्या नियोजनसाठी मायणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
४येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये सातारा मराठा महामोर्चाच्या संदर्भात नियोजन बैठक झाली. त्यामध्ये सातारा येथे होणाऱ्या महामोर्चासाठी सहभागी होणे, जायचे कसे, याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच यावेळी अनेकांनी सहकार्य करण्याचे जाहीर केले.
४येथील ग्रामपंचायतीजवळ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मराठा कन्यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी मायणीसह परिसरातील शेकडो मराठाबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)