चाळीस टक्के निधी पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:28 PM2019-01-28T23:28:38+5:302019-01-28T23:28:43+5:30
नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी फिरता निधी म्हणून ७९ ...
नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी फिरता निधी म्हणून ७९ लाख रुपये मंजूर असून, आतापर्यंत फक्त ६० टक्केच रक्कम खर्च झाली आहे. त्यातच आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने बाकी असताना उर्वरित ३१ लाख ३५ हजार रुपये खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेपुढे राहणार आहे. त्यामुळे ही उद्दिष्टपूर्ती करताना दमछाकच होणार आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागात महिलांचे बचत गट निर्माण होत आहेत. या गटाच्या माध्यमातून एकत्र येत महिला रोजगार निर्माण करत आहेत. या रोजगारातून महिला स्वावलंबीही बनत आहेत, त्यामुळे या बचत गटातील महिलांना आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे बचत गटासाठी फिरता निधी.
केंद्र शासनाच्या ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी फिरता निधी देण्यात येतो, त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काम चालते. हा विभाग जिल्ह्यातील महिलांच्या गटाला प्रस्तावानुसार जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यंत फिरता निधी देतो. सातारा जिल्ह्यातही या विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो बचत गटांना निधी प्राप्त झाला आहे. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ७९ लाख २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
एप्रिल २०१८ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. या वर्षासाठी सुमारे ७९ लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून जिल्ह्यातील ५२८ महिला बचत गटांना फिरता निधी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत त्यातील फक्त ३१९ गटांनाच फिरता निधी देण्यात आला असून, उर्वरित २०९ गटांना निधी देण्याचे काम बाकी आहे. म्हणजेच आतापर्यंत फक्त ४७ लाख ८५ हजारांचा निधी खर्ची करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित ३१ लाखांचा निधी दोन महिन्यांत खर्च करावा लागणार आहे. कारण आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी फिरत्या निधीसाठी अर्ज केले असून, त्यांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आले आहेत.
असा निधी मिळतो...
बचत गटांना फिरता निधी मिळतो. त्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवावे लागतात. गट स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांनीच हा निधी देता येतो. महिला बचत गटांना अधिकाधिक १५ हजारांपर्यंत निधी देण्यात येतो. यामध्ये तीन गट असून, अ गटासाठी १५ हजार, ब साठी १२ तर क गटासाठी १० हजार रुपये मिळतात. सातारा जिल्ह्णातील जवळपास सर्वच गट हे अ मध्येच आहेत. तर फिरत्या निधीची पुढील तीन महिन्यांत गटाअंतर्गतच परतफेड होते. त्यानंतर बँकेमार्फत एक लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.