वय वर्षे चाळीस; पण आम्ही लग्नाळू..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:27 AM2018-04-14T00:27:00+5:302018-04-14T00:27:00+5:30
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : कायद्यानं विवाहयोग्य वय ठरवून दिलंय. पंचविशीत तरी मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात, असे सामाजिक संकेतही आहेत; पण सध्या चाळिशी गाठली तरी मुलाचे हात पिवळे होईनात. पूर्वी वधू पित्याला मुलीच्या विवाहाचं ‘टेन्शन’ असायचं; पण सध्या पोरगं वयात आलं की, पित्याची धाकधूक वाढतेय. कसं जमवायचं आणि कुठं जमवायचं, हाच प्रश्न वरपित्याला सतावतोय.
मुलीचं अठरा तर मुलाचं वय एकवीस वर्ष झालं की ते विवाहयोग्य असल्याचे कायदा सांगतो. मुलींच्या तुलनेत मुलांच्यात सज्ञानपणा उशिराने येतो. त्यामुळे विवाहात मुलीपेक्षा मुलाचं वय जास्त असावं, असं सांगितलं जातं. त्याला काही शास्त्रीय कारणेही आहेत. मात्र, सध्या वेगवेगळ्या कारणास्तव मुलांची लग्न रखडल्याचे दिसून येते. पूर्वी विवाह जमविणे वडीलधाऱ्यांच्या हातात होते. युवक-युवतींना विवाहाबाबत फारसे स्वातंत्र्य नव्हते. मात्र, बदलत्या जमान्यात मुला-मुलींच्या पसंतीला महत्त्व आले. त्यांना पटत असेल तरच वडीलधाºयांकडून पुढील बोलणी होतात. त्यातच सध्या शिक्षणाशिवाय पर्याय उरलेला नाही. पदवीपर्यंतचे शिक्षण करिअरसाठी पुरेसे ठरत नाही. त्यामुळे विवाहातही उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. उच्च शिक्षण, मोठ्या कंपनीत नोकरी या मुलींच्या प्रमुख अपेक्षा असतात. या पहिल्याच अपेक्षेत अनेक युवक नापास होतात. त्यातच ग्रामीण भागात राहण्यास अनेक युवती तयार होत नाहीत. शहरात फ्लॅट असावा, असेही युवतींचे म्हणणे असते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या युवकांना वधू शोधताना सुरुवातीलाच ‘फ्लॅट’ची अपेक्षा नसलेली युवती शोधावी लागते.
ग्रामीण भागातल्या शेतकरी युवकांची विवाहासाठी दैना उडत असताना शहरी भागातील युवकांची परिस्थितीही याहून वेगळी राहिलेली नाही. उच्च शिक्षण, चांगली नोकरी, शहरात फ्लॅट असूनही अनेक युवकांचे विवाह रखडलेत. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यांना प्रत्येकवेळी नकाराचा सामना करावा लागतोय. शहरी कुटुंबांकडे बहुतांशवेळा शेतजमीन नसते. आणि वधूच्या अपेक्षा पूर्ण होत असल्या तरी वधूपित्याच्या शेतजमिनीच्या अपेक्षेमुळे शहरी युवकांचे विवाह जमत नाहीत, अशी परिस्थिती आहे. सद्यस्थितीत प्रत्येक गावात वयाची तीशी ओलांडलेल्या अनेक युवकांचे पालक मुलासाठी वधुच्या शोधात असल्याचे चित्र आहे.
एकतर ‘चौकोनी’, नाहीतर ‘दोघेच’
विवाह रखडलेल्या युवकांमध्ये एकत्रित कुटुंबातील युवकांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. एकत्रित कुटुंबपद्धती सध्या मागे पडली आहे. आजी, आजोबा, चुलते, चुलती, भाऊ, बहिणी अशा भल्यामोठ्या कुटुंबाचा व्याप सांभाळण्याची मानसिकता अनेकांमध्ये नाही. त्यामुळे बहुतांश युवतींमध्ये एकत्रित कुटुंबाविषयीची आस्थाही कमी झाली आहे. ‘चौकोनी’ कुटुंबाला युवतींकडून पसंती दिली जाते. त्याचबरोबर ‘शहरात फ्लॅट आणि दोघेच’ असा नवा ट्रेंडही रुजू पोहतोय. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील मुलांची लग्ने जमविताना प्रचंड अडचणी निर्माण होताना दिसून येत आहेत.
शेतकरी नवरा नको गं बाई..!
शेती आणि त्यावर अवलंबून असणारं कुटुंब, याला अपवाद वगळता वधू किंवा तिच्या पित्याकडूनही फारसं महत्त्व दिलं जात नाही. मुलगी नोकरी करणारा असावा, अशी बहुतांश वधूपित्यांची इच्छा असते. तसेच शेतीतील कष्टाची कामे करण्यास सध्या युवक आणि युवतीही धजावत नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी मुलांचे विवाह रखडल्याचे दिसते.